एकनिष्ठता संपली
By admin | Published: February 20, 2015 12:05 AM2015-02-20T00:05:05+5:302015-02-20T00:05:05+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना फुटीचा फटका बसू लागला आहे.
नामदेव मोरे ल्ल नवी मुंबई
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. बहुतांश सर्वच प्रमुख पक्षांना फुटीचा फटका बसू लागला आहे. नवी मुंबईच्या राजकारणामध्ये आता पक्ष व नेत्यांविषयी एकनिष्ठता ही कालबाह्य गोष्ट झाली आहे. नेते व कार्यकर्तेही सोयीनुसार पक्ष व निष्ठा बदलू लागल्याचे चित्र दिसत आहे.
पक्षांतराचा सवार्धिक फटका काँगे्रसला बसला असून, त्यांचे आतापर्यंत सहा नगरसेवक फुटले आहेत. अजून चार नगरसेवक कोणत्याही क्षणी पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या दोन नगरसेवकांनी पक्ष सोडला असून, अजून जवळपास १२ जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. स्वत: पक्षाचे नेते गणेश नाईक भाजपात जाणार असल्याच्या चर्चा दोन महिन्यांपासून सुरू होत्या. शिवसेना व भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बहुतेक प्रमुख नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केले आहे. सोयीनुसार नेते व पक्ष बदलला जात असल्याचे चित्र दिसत आहे. ज्यांच्या विरोधात काम केले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ येत आहे.
शहराच्या राजकारणावर पकड असणारे गणेश नाईक पूर्वी शिवसेनेत होते, नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपा असे पक्षांतर केले आहे. पूर्वी अपक्ष नगरसेवक असणाऱ्या शिवराम पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास करून आता पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. विजय चौगुले यांनीही शिवसेना, राष्ट्रवादी ते शिवसेना असा प्रवास केला आहे. नामदेव भगत यांनीही काँगे्रसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक भरत जाधव यांनी भाजपा, राष्ट्रवादी काँगे्रस अशी भटकंती करून पुन्हा नवीन पर्यायाचा शोध सुरू केला आहे. जुईनगरमधील नगरसेवक रंगनाथ औटी यांनी राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस ते आता शिवसेना असा प्रवास केला आहे. अनंत सुतार यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नगरसेवक विठ्ठल मोरे यांनीही शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा स्वगृही परतले आहेत. कधी नेत्यांची भांडणे झाल्यामुळे, कधी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून तर कधी वेळेची गरज म्हणून पक्षांतर केले जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वेळची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाईक परिवार आपली सत्ता टिकविण्यासाठी प्रयत्न करणार असून, इतर सर्व पक्ष सत्ता मिळविण्यासाठी धडपडत आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडत आहे.
नवी मुंबईमध्ये पक्षांतर करण्याचा ट्रेंड जसा वाढला आहे तसा पक्षात राहून विरोधकांचे काम करण्याचे प्रकारही अनेक वेळा पहावयास मिळतात. शिवसेनेचे काही पदाधिकारी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संगनमत करत असल्याचे नेहमीच बोलले जाते.
बैठकांची छायाचित्रेही एका नेत्याने स्वत:जवळ जपून ठेवली आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँगे्रसच्या जिल्हा कार्यकारिणीने उघडपणे शिवसेनेचा प्रचार केला होता. पालिकेच्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेला सहकार्य केले होते.
याविषयी बेलापूरचे उमेदवार नामदेव भगत यांनी पक्षश्रेष्ठींकडेही तक्रार केली होती. परंतु पक्षाने दखल घेतली नसल्यामुळे नाईलाजाने त्यांनी पक्षाला रामराम केला. यामुळे जसे उघड पक्षांतर करणारे आहेत, तसे पक्षात राहून इतरांचे काम करणाऱ्यांची संख्याही मोठी असून, पक्षनिष्ठा ही गोष्टच शिल्लक राहिली नसल्याचे दिसत आहे.
नावसुरुवातीचा व सद्य:स्थितीमधील पक्ष
गणेश नाईकशिवसेना, स्वत:ची संघटना, आता राष्ट्रवादी
मंदा म्हात्रेकाँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस आता भाजपा
विजय चौगुलेशिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
वैभव नाईकशिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, भाजपा
नामदेव भगतकाँगे्रस, शिवसेना
शिवराम पाटीलअपक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
विठ्ठल मोरेशिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना
भरत जाधवभाजपा, राष्ट्रवादी काँगे्रस, पक्षाचा शोध सुरू
अनंत सुतारशिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस
रंगनाथ औटीराष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेना
संगीता सुतारकाँगे्रस, भाजपा
विलास भोईरकाँगे्रस, शिवसेना