Join us

गुप्तचर यंत्रणांनी सरकार वा समाजाच्या वरचढ होऊ नये- व्ही. बालचंद्रन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 8:00 AM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावर नाव न घेता केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गुप्तचर यंत्रणांनी सरकार किंवा समाजाच्या वरचढ होऊन काम करू नये. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेव्हा सीमेवर जाऊन पलीकडील सैनिकांशी चर्चा करतात तेव्हा त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका राष्ट्रीय सुरक्षाविषयक अभ्यासक, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांमध्ये जबाबदारीच्या पदावर काम केलेल्या वप्पला बालचंद्रन यांनी अजित डोभाल यांचे नाव न घेता केली. टाटा लिट फेस्टमधील एका परिसंवादात शनिवारी ते बोलत होते.

गुप्तचर यंत्रणेचे अपयश हे माहिती गोळा करताना राहून गेलेल्या त्रुटींमुळे ठरते की त्या माहितीचे विश्लेषण करताना वा ती इतर संबंधित यंत्रणांना अवगत करताना झालेल्या हलगर्जीपणावर ठरते, या परिसंवादाने प्रकाश टाकला. माजी केंद्रीय मंत्री, राजनैतिक अधिकारी मणिशंकर अय्यर, आयपीएस अधिकारी डॉ. मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी सहभाग घेतला. 

बालचंद्रन म्हणाले...

  • राष्ट्रीय सुरक्षेबाबत परदेशातून येणारी माहिती गुंतागुंतीच्या कोड्यासारखी असते. त्याचा परस्परसंबंध, विश्लेषण योग्य पद्धतीने होऊन ती संबंधित यंत्रणांकडे वेळीच पोहोचली नाही तर गडबड होऊ शकते. 
  • २६/११ च्या वेळेस महाराष्ट्रातील सर्व यंत्रणाच कोलमडून गेल्याचे पाहायला मिळाले. मात्र यातून धडा घेत केंद्र सरकारने आपल्या कार्यपद्धतीत अनेक बदल करत गुप्तचर यंत्रणाकडून आलेल्या माहितीचे योग्य स्तरावर विकेंद्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 

 ‘ओपन सोर्स’ची विश्वासार्ह माहिती

पत्रकार कुणाल पुरोहित यांनी या परिसंवादाचे संचलन केले. बालचंद्रन यांच्या इंटेलिजन्स ओव्हर सेन्च्युरिज हे पुस्तक चर्चेच्या केंद्रस्थानी होते. वांद्रे येथील सेंट पॉल इन्स्टिट्यूट येथे सायंकाळी हा परिसंवाद पार पडला. अय्यर यांनी गुप्तचर यंत्रणांच्या विश्वासार्हतेवरच बोट ठेवले. गुप्तचर यंत्रणांपेक्षा ‘ओपन सोर्स’ कडून अधिक विश्वासार्ह माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. मीरा बोरवणकर यांनी पारंपरिक आणि आधुनिक काळातील पेगॅसससारख्या आयुधांचा विरोधकांविरोधात वापर करण्याचा प्रकार अयोग्य असल्याचे स्पष्ट केले.

२६/११ ला १६ अलर्ट

२६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर नेमलेल्या समितीवर बालचंद्रन यांनी काम केले आहे. त्यावेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरून राज्य सरकारला १६ अलर्ट देण्यात आले होते. मात्र मंत्री आणि सचिव पातळीवर आलेल्या या अलर्टची दखल घेऊन पोलिस आयुक्तांना उपाययोजना करण्यासाठी सावध करणे आवश्यक होते. कारगिलच्या वेळेस तर असे ४३ अलर्ट देण्यात आले होते, अशी माहिती बालचंद्रन यांनी दिली.

टॅग्स :अजित डोवाल