Join us

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात सरकारला गंधवार्ताही असू नये हे इंटेलिजन्स फेल्युअर- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 11:31 AM

रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई- गेल्या साडेतीन तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. विद्यार्थ्यांनी आता रेल्वे ट्रॅक मोकळे केले आहेत. तसेच रेल्वे जीएमशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटर करत ते म्हणाले, रेल्वेभरती परीक्षेसाठी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलन करणार आहेत, याची गंधवार्ताही सरकारला असू नये हे Intelligence Failure आहेच. तसेच गेल्या 3 वर्षांत सातत्यपूर्णरीत्या रोजगार निर्मितीतील अपयश हे आता रस्त्यावरील विद्यार्थी व बेरोजगारांच्या उग्र आंदोलनाने समोर आणले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबत केंद्र सरकारवरही टीका केली आहे. मध्य रेल्वेच्या दादर-माटुंग्या या स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मनसेनंही उडी घेतली होती.मनसे नेते संदीप देशपांडे आंदोलनस्थळी दाखल होत त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चासुद्धा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला होता. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांना चर्चेला बोलावावं, आम्ही आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्यानं एकही लोकल पुढे सरकू शकत नव्हती. परंतु आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे. परंतु या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांवर हे आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळेच आली आहे.आधी रेल्वे अप्रेटिंसच्या विद्यार्थ्यांना थेट रेल्वेत सामावून घेतलं जात होतं, पण आता त्यासाठी रेल्वे प्रशासनानं 20 टक्क्यांच्या कोटा आरक्षित केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेण्यासाठी लेखी परीक्षाही अनिवार्य केली आहे. त्यामुळे बाहेरून येणा-या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जात असल्याचा या अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रेल्वे प्रशासनानं मान्य न केल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला होता. विशेष म्हणजे यात अनेक मराठी तरुणांचाही समावेश होता.

टॅग्स :धनंजय मुंडेमध्य रेल्वेमुंबई रेल रोको