मुंबई : शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच शिक्षक भरतीमधील मनमानी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सुरू केल्यानंतर, आता शिक्षक होण्यासाठी ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून, या चाचणीसाठीची कार्यवाही डिसेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतले आहेत. शिक्षकांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे, पण आता शिक्षकांना नोकरी मिळविण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेबरोबरच ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता’ चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित आणि अनुदानास पात्र घोषित केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षणसेवक भरतीसाठी ही चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल, असे शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयामध्ये म्हटले आहे.
शिक्षक होण्यासाठी आता बुद्धिमत्ता चाचणी, डिसेंबरपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 5:50 AM