चारकोप पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चारकोपच्या साई सच्चिदानंद मंदिरात लागलेल्या आगीच्या भडक्यात होरपळून रविवारी तिघांचा मृत्यू झाला. मात्र, ही आग अपघाताने नाही तर सूड उगविण्यासाठी जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे त्याठिकाणी झालेल्या स्फोटाच्या तीव्रतेवरून पोलिसांच्या लक्षात आले आणि अल्पवयीन आरोपीसह औरंगाबादवरून मुख्य मारेकऱ्याचा त्यांनी गाशा गुंडाळला.
रविवारी मंदिरातील आगीत युवराज पवार (२८), सुभाष खोडे (२८) आणि महेश गुप्ता ऊर्फ मोनू (२४) हे मृत्युमुखी पडले. चारकोप पोलिसांनी अटक केलेला आरोपी भावेश चांदोरकर (२०) हा खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करतो. त्याचे पवार याच्यासोबत वैमनस्य होते. पवारने दीड वर्षांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या वादातून त्याच्या नाकाला दुखापत केली होती. तसेच सतत शिवीगाळ, मारहाण व अपमान करणाऱ्या पवारवर चांदोरकरला प्रचंड चीड होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी सिगारेट पीत असलेल्या चांदोरकरला पवारने सिगारेट आणायला सांगितले. मात्र, ''मी तुझ्या बापाचा नोकर नाही'', असे उत्तर त्याने पवारला दिले आणि तेव्हाही पवारने त्याला मारहाण केली. त्यावरून या वादाची ठिणगी पडली आणि त्याला जिवंत जाळण्याचे चांदोरकरने ठरविले.
...अखेर संधी मिळाली
चांदोरकरने त्याच्या स्कूटीमधील पाच लीटर पेट्रोल एका कॅनमध्ये भरून ठेवले. नेमका रविवारी पवार अन्य दोघांसह मंदिरात झोपल्याचे त्याला समजले. ती संधी साधत त्याने पहाटे ४ च्या सुमारास सोबत आणलेले पेट्रोल त्यांच्या आजूबाजूला ओतून ते पेटवून दिले. त्यामुळे लगेचच आगीचा भडका उडाला आणि जवळच असलेल्या वॉटर व एअरकूलरचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी वाटल्याने याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
फॉरेन्सिकने व्यक्त केला संशय आणि...
फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यामध्ये निव्वळ वॉटर आणि एअरकूलरच्या भडक्यातून इतकी भीषण आग लागू शकत नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार, चारकोप पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम नायर व सहायक पोलीस निरीक्षक विक्रम बाबर आणि पथकाने चौकशी सुरू केली. गुप्त बातमीदाराच्या मदतीने पवारचे चांदोरकरसोबत असलेले वैमनस्य उघड झाले आणि मुंबई सोडून औरंगाबादला पसार झालेल्या चांदोरकरला आणि त्याला मदत करणाऱ्या अल्पवयीन साथीदाराला अवघ्या २४ तासांत गजाआड करण्यात आले. यात गुप्ताचा काहीच संबंध नसूनही त्याचा विनाकारण बळी गेल्याचेही उघड झाले.