राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:06 AM2021-04-09T04:06:31+5:302021-04-09T04:06:31+5:30
आराेग्य विभागाची माहिती; देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक ५६ टक्के सक्रिय रुग्ण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गेल्या वर्षी ...
आराेग्य विभागाची माहिती; देशाच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक ५६ टक्के सक्रिय रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असून, संसर्गाची तीव्रताही अधिक असल्याचे दिसून आले आहे.
राज्यात ११ फेब्रुवारी २०२१ रोजी काेराेनाचे ३०,२६५ इतके सक्रिय रुग्ण होते, तर आता ७ एप्रिलच्या नोंदीनुसार या संख्येने पाच लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. १७ सप्टेंबर २०२० रोजी राज्यात ३ लाख १ हजार ७५२, तर ७ एप्रिल रोजी ५ लाख १ हजार ५५९ एवढ्या सक्रिय रुग्णांची नाेंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात बुधवारी पहिल्यांदा पॉझिटिव्हीटीचे प्रमाण १५ टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्क्यांवर असून, मृत्यूदर १.७९ टक्के आहे. देशभरात राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असून, हे प्रमाण ५६ टक्के आहे.
राष्ट्रीय स्तराचा विचार करता सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पहिल्या तीन राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक २.८० टक्के मृत्यूदर असून, त्याखालोखाल सिक्कीमध्ये २.१६ टक्के आहे, त्यानंतर राज्यात हे प्रमाण १.७९ टक्क्यांवर आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात जानेवारी २०२१ महिन्यात दर दिवशी २९७३ रुग्ण, फेब्रुवारी महिन्यात दर दिवशी ४६९० रुग्ण आढळून येत होते. अचानक मार्च महिन्यात यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही संख्या दर दिवशी २१ हजार ०१६ रुग्णांवर पोहोचली. राज्यात १ एप्रिल ते ७ एप्रिल २०२१ या कालावधीत केवळ सात दिवसांत ३ लाख ६० हजार १९३ रुग्णांची नोंद झाली आहे.
संसर्गाचा पहिला भर/ पहिली लाट आणि सध्याची परिस्थिती यांची तुलना ( रुग्ण )
जिल्हा/ शहर पहिली शिखर पातळी
( First Peak)
सप्टेंबर २०२० ६ एप्रिलची परिस्थिती
मुंबई ३४२५९ ७९३६८
पुणे ८२१७२ ८४३०९
नाशिक १६५५४ ३१६८८
औरंगाबाद १००५८ १७८१८
नागपूर २१७४६`` ५७३७२
ठाणे ३८३८८ ६११२७