Join us

घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण, तापमान ३४वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 2:31 AM

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मंगळवारी पहाटेपासून दुपारपर्यंत मुंबईसह उपनगरावर मळभ दाटून आले होते.

मुंबई : राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मंगळवारी पहाटेपासून दुपारपर्यंत मुंबईसह उपनगरावर मळभ दाटून आले होते. तर दुपारी मळभ हटल्यानंतर पडलेल्या तापदायक उन्हाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला मारा कायम ठेवला होता. एकंदर दिवसभर निर्माण झालेल्या दुहेरी वातावरणामुळे येथील उकाड्यात वाढ झाली होती. त्यामुळे घामाच्या धारांनी मुंबईकर अक्षरश: हैराण झाले होते.मागील आठवड्याभरापासून राज्यासह मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमान आठवड्याभरापासून ३४ तर किमान तापमान २८ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. शिवाय मळभ दाटून येण्याचे प्रमाणही वाढले असून, मंगळवारी यात आणखी भर पडली होती. पहाटेपासून शहर आणि उपनगरावर मळभ दाटून आले होते. दुपारपर्यंत हे मळभ कायम होते. परिणामी, उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाने हैराण झाले होते. तर दुपारी मळभ हटल्यानंतर सूर्यकिरणांच्या प्रखर माऱ्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखीच वाढ झाली होती. (प्रतिनिधी)> मुंबईसाठी अंदाज : ११ आणि १२ मे रोजी मुंबईसह आसपासच्या परिसरावरील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील.>राज्याची स्थिती : ११ आणि १२ मे रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे. १३ आणि १४ मे रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस तर ११ ते १६ मेपर्यंत पुणे परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.