Join us

धारावीत चाचणी मोहीम तीव्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 4:51 AM

CoronaVirus News in Dharavi : माहीम परिसरात मोबाइल व्हॅनद्वारे शनिवारी दिवसभर चाचणी करण्यात आली, तर धारावीत सलग तीन दिवस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट ठरलेल्या जी उत्तर विभागाने बाजी मारली. धारावी पॅटर्नने तर संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर मुंबईत रुग्णांच्या संख्येत अंशत: वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून माहीम आणि धारावी भागात चाचणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. माहीम परिसरात मोबाइल व्हॅनद्वारे शनिवारी दिवसभर चाचणी करण्यात आली, तर धारावीत सलग तीन दिवस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. दादर, धारावी आणि माहीम परिसरात असलेला जी उत्तर विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. या विभागात मार्च २०२०पासून आतापर्यंत १३ हजार ८१६५ बाधित रुग्ण आढळून आले. यापैकी १२ हजार ९७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २०५ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असल्यामुळे दादर परिसरही सतत गजबजलेले असतो. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका लक्षात घेता माहीम आणि धारावी परिसरात चाचणी शिबिरे सुरू आहेत. धारावीत शांती इमारत, ९० फूट रोड येथे शनिवार ते सोमवार आरटीपीसीआर चाचणी सुरू आहे, तर माहीम परिसरात शनिवारी दिवसभर मोबाइल व्हॅनद्वारे चाचणी करण्यात आली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई