लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चार राज्यांत भाजपाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता मुंबई महापालिकेकडे भाजपाने मोर्चा वळवला आहे. उत्तर प्रदेशामध्ये जे मंत्री होतील त्यांना मुंबईत आणून त्यांच्यासोबत उत्तर भारतीयांचे मेळावे घेण्याचे आयोजन केले जात आहे. लवकरच आपण चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत सत्कार घडवून आणणार आहोत, अशी माहिती भाजपाचे उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तीन राज्यांच्या भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईत बोलाविण्यात येणार आहे. त्यांचा सत्कार करण्याची कल्पना आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मुंबईत बोलाविण्यात येईल. त्यांचा भव्य सत्कार केला जाईल. मुंबईत येऊन स्थायिक झालेले उत्तर भारतीय हे कष्टकरी आहेत. अनेकांचे पोट हातावर आहे. दिवसभर कष्ट आणि मजुरी केल्यानंतरच त्यांच्या घरात चूल पेटते. अशा लोकांशी उत्तर प्रदेशचे मंत्री येऊन बोलतील. त्यांचे प्रश्न समजून घेतील. त्यामुळे एक विश्वासाचे वातावरण तयार होईल. यासाठीचा आपण प्रयत्न करत आहोत, असेही सिंह यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने गोव्यात देवेंद्र फडणवीस यांनी विजय मिळवला, तसाच विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत मिळेल. संपूर्ण उत्तर भारतीय मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहील, यासाठी आपण स्वतः एक लाख लोकांच्या घरी जाऊन भेटणार आहोत. मुंबई, ठाणे, वाशी या भागातल्या उत्तर भारतीयांना आपण प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहोत. महापालिका निवडणुकांना आणखी बराच कालावधी आहे. त्याचा फायदा घेत उत्तर भारतीयांचे वेगवेगळे मेळावे आयोजित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप स्वबळाची भाषा करतात. मात्र, कोणाच्या भरोशावर ते ही भाषा करतात? याचे उत्तर त्यांनाच ठाऊक. मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले, तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा भाजपाला होईल. काँग्रेस शिवसेनेसोबत गेली किंवा नाही गेली तरीही फार फरक पडणार नाही. काँग्रेसच्या अवस्थेबद्दल मी जास्त काय बोलणार? सगळ्यांना सगळे माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.