लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : साकीनाकापाठोपाठ ठाण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. अनेक घटनांमध्ये पीडिता या अल्पवयीन आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी पोलीस पोहचू शकत नाहीत, अशा ठिकाणी महिला पोलीस मित्रांच्या मदतीने संवाद स्थापन करणे गरजेचे असल्याचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
दीक्षित यांनी सांगितले की, बहुतेक सर्व गैरप्रकार करण्यात ओळखीचे लोक, नातेवाईक, शेजारी हेच जास्तीतजास्त आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहेत. या व्यक्तींविरुद्ध तक्रार करायला पीडिता तयार होत नाहीत. तसेच पालक मुलीला तक्रार करू नये यासाठी दबाव आणतात. पीडिता हीच जणू काही दोषी आहे अशी वागणूक समाजातून दिली जाते. हे ओळखून अल्पवयीन मुलींनी ओळख असलेल्या किंवा विश्वासू वाटणाऱ्या कोणत्याही पुरुषांबरोबर एकट्याने राहताना जास्तीतजास्त खबरदारी घेणे व विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवण्यास विरोध करणे आवश्यक आहे.
छेडछाडीच्या घटनांमध्ये पीडितेचा जबाब व अन्य पुरावे एकत्र करून पोलिसांनी २४ तासांत दोषारोपपत्र पाठवणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. योग्य वेळीच टवाळखोरांना शिक्षा झाल्यास बलात्कारासारखे पुढील गंभीर गुन्हे कमी होण्यास मदत होते. महिला पोलिसांनी आपल्या हद्दीतील महिला बचतगट सदस्या, महिलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने शाळा व महाविद्यालयातील मुलींसाठी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अथवा झूम सारख्या ॲपची मदत घेऊन जनजागृती करणे, महिलांमध्ये व अल्पवयीन मुलींमधे पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे, असेही दीक्षित यांनी सांगितले.
‘महिला पोलीस मित्र संकल्पना राबवा’
अत्याचाराच्या बळी असणाऱ्या पीडितांशी संवाद साधून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास प्रोत्साहित करणे, न्यायालयात त्यांना खंबीर आधार देऊन सत्य सांगण्यास पाठिंबा देणे आवश्यक आहे. पोलिसांनीही महिला पोलीस मित्र ही संकल्पना राबवून, ज्या ठिकाणी पोलीस उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी महिला पोलीस मित्रांच्या मदतीने अल्पवयीन मुलींशी संवाद स्थापन करणे जरुरीचे आहे. समाजानेही ह्या पीडितेंच्या बाबतीत आपला दृष्टीकोन बदलून त्यांना सतत मानसिक आधार मिळेल याची खात्री करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.