मुंबई : मुंबई आणि गोवा अंतर सध्याच्या १२ तासांवरून सहा तासांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण एक्स्प्रेसवेवर १४ ठिकाणी इंटरचेंज दिले जाणार आहेत. त्यातून या महामार्गावर १४ ठिकाणांवरून वाहनांना प्रवेश करता येईल. त्यामुळे कोकणातला प्रवास जलद होणार आहे.
कोकणातील दळणवळण जलद करण्यासाठी ३७६ किमी लांबीचा कोकण एक्सप्रेसवे प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतला आहे. हा महामार्ग सहा मार्गिकांचा असून त्याची रुंदी १०० मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अलिबागमधील शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे त्याचा शेवट होणार आहे. हा महामार्ग संपूर्णपणे प्रवेश नियंत्रित असणार असून १०० ते १२०च्या वेगाने वाहने धावतील अशा पद्धतीने त्याची निर्मिती केली जाणार आहे.
कोकणातील १७ तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहेत. त्यामुळे इंटरचेंज दिलेल्या ठिकाणीच वाहनांना प्रवेश करता येईल, तसेच महामार्गावरून बाहेर पडता येणार आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील शहाबाज, रोहा तालुक्यातील घोसळे, माणगाव तालुक्यातील मढेगाव, मंडणगड तालुक्यातील केळवट, दापोली तालुक्यातील वाकवली, गुहागर तालुक्यातील गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील भालवली, देवगड, मालवण, कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळ, सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत.
४१ बोगदे प्रस्तावितएमएसआरडीसीने पर्यावरण विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावात या ३७६ किमी लांबीच्या महामार्गासाठी ४१ बोगदे प्रस्तावित केले आहेत. त्याचबरोबर २१ मोठे पूल आणि ४९ छोटे पूलही प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१४६ हेक्टर वन जमीन होणार बाधित- या महामार्गासाठी ३७९२ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यातील १४६ हेक्टर वन जमीन या महामार्गाने बाधित होणार आहे. - एमएसआरडीसीकडून या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. - पर्यावरण विभागाच्या सूचनांनुसार महामार्गाच्या संरेखनात बदल करून प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महामार्गाची लांबी ३७५.९४ किमी मार्गिका ०६प्रकल्प खर्च ६८,७२० कोटी