- अजय परचुरेमुंबई : ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात ६० तासांच्या सलग कार्यक्रमांचा घाट घालण्यात आला. हा घातलेला घाट कितपत यशस्वी होईल याबाबत रंगकर्मींच्या आणि रसिकांच्या मनातही साशंकता होती. नोकरीवरून दमूनभागून येणारा मुंबईकर मध्यरात्री होणाऱ्या नाट्य संमेलनातील कार्यक्रमांना उपस्थिती दाखवेल का, या प्रश्नावर आता पडदा पडला आहे. नाट्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी पहाटेपर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांना महाकवी कालीदास नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद होता. ज्यात सामान्य प्रेक्षकांपासून मराठी रंगभूमीवरील कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली होती.संमेलनाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनानंतर ‘संगीत सौभद्र’ हे संगीत नाटक होतं, त्यानंतर पंचरंगी पठ्ठेबापूराव आणि यमुनाबाई वाईकर यांना समर्पित ‘रंगबाजी’ हा कार्यक्रम होता. आणि पहाटे राहुल देशपांडेंची सुरेल मैफल होती. मध्यरात्री लागोपाठ सुरू असलेल्या कार्यक्रमांना रसिकांनी नुसती उपस्थितीच दर्शविली नाही, तर प्रत्येक कार्यक्रमाला आपली उत्स्फूर्त दादही दिली. खोपोली, पनवेल, नवी मुंबई, कर्जत, बोरीवली, विलेपार्ले या भागांतूनही काही रसिक लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी मध्यरात्री कालीदास नाट्यमंदिरात ठाण मांडून होते. सामान्य मायबाप रसिक प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रेटीही या लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी रात्रभर उपस्थित होते. शशांक केतकर, सागर कारंडे,अनिता दाते, भारत गणेशपुरे, हेमांगी कवी आदीकलाकार लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी बसले होते़
६० तासांच्या संमेलनाबाबत रसिक खूश, रात्रभर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:17 AM