मुंबई : निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अधिकच लगीनघाई सुरू झाली. ‘वरिष्ठ’ नेतृत्वांकडूनच अजून उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेले नसले, तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र, मतदारांच्या थेट घरोघरी भेट घेण्यास सुरुवात केली आहे. मतदाराच्या घरी जाऊन थेट घरातील सदस्यांची विचारपूस करण्यावर इच्छुकांनी भर दिला आहे.अवघ्या महिन्यावर पालिका निवडणुका येऊन ठेपल्या असल्या, तरी अजूनही उमेदवारांची अंतिम यादी निश्चित व्हायची आहे. त्यात सेना-भाजपा युतीचा तिढा न सुटल्याने, कार्यकर्त्यांमध्येही काहीसे संभ्रमाचे वातावरण दिसून येते आहे. मात्र, तरीही ठिक-ठिकाणी पक्षातील इच्छुकांनी जनसंपर्क वाढविण्यासाठी थेट मतदारांच्या घरोघरी भेट देण्यास सुरुवात केली आहे.मतदारांच्या घरात हजेरी लावून ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेणे, तरुणपिढीशी संवाद साधणे, गृहिणींच्या समस्यांची विचारपूस करण्यासाठी इच्छुकांनी धडपड सुरू केली आहे. विशेष म्हणजे, ई वॉर्डमधील बऱ्याच प्रभागांमध्ये चाळींमधील स्थानिकांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात सेना आणि काँग्रेसमधील इच्छुकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते आहे. मात्र, यात मतदारांनी सर्व इच्छुकांना ‘तुम्हालाच मत देणार’ असा सावध पवित्रा पत्करत, उमेदवारांना पडताळणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)
इच्छुकांचा घरोघरी जाऊन संवाद
By admin | Published: January 22, 2017 2:50 AM