Join us

मुंबईच्या लोकलमधले गंमतीदार फॅक्ट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 7:10 PM

मुंबई लोकल म्हणजे मुंबईकर व आसपासच्या लोकांसाठी लाईफलाईन.

ठळक मुद्देट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणतीही मालिका बघण्याची गरज नाही.घरी जाऊन भाजी साफ करण्यात वेळ जाऊ नये म्हणून ...फास्ट आणि स्लो लोकलमध्ये काय फरक आहे याचं उत्तर आजही कित्येकांना मिळालेलं नाही.

मुंबई - लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन म्हणजे मुंबई आणि मुंबईजवळ राहणाऱ्यांचा प्राणवायू समजली जाते. मुंबई बंद पाडण्याची ताकद फक्त लोकलमध्येच आहे असंही म्हणतात. नेहमी या ट्रेनने प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे प्रवासातले अनेक किस्से असतात. हे किस्से कधी भयानक तर कधी हलके-फुलके असतात. या रेल्वेने आपले जीवन वेगवान केल्याने अनेकजण या वाहतूक व्यवस्थेलाच देव मानतात.  एका जागेहून दुसऱ्या जागी सुरक्षितपणे(?)  नेणाऱ्या या लोकलविषयीही अनेक विनोद, मेम्स सोशल मीडियावर शेअर होत असतात. त्यातलेच  काही हटके फॅक्ट्स आपण पाहूया.

ट्रेनमध्ये चढण्याची कसरत

ऐकवेळ आपल्याला आयआयटी किंवा आयआयएममध्ये प्रवेश मिळेल पण दादरहून विरारची  किंवा कल्याणची ट्रेन पकडणं अवघड आहे. ट्रेन थांबण्याआधीच ट्रेनमध्ये चढण्याची जो कसरत करेल त्यालाच निदान फोर्थ सीट मिळू शकेल. 

स्वित्झर्लंडच्या लोकसंख्येएवढे लोकलचे प्रवासी

रोज लोकलमधून जवळपास ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात अशी आकडेवारी सांगते. पण तुम्हाला माहितेय का स्वित्झर्लंडची लोकसंख्याही अगदी तेवढीच आहे. म्हणजे अख्खं स्वित्झर्लंड आपल्या ट्रेनमध्ये राहू शकतं. 

फोर्थ सीटसाठी केला अट्टाहास

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याच प्रकारचे नियम बनवलेले नसताना. मात्र मुंबई लोकलमध्ये अनेक अलिखित नियम आहेत. तीन जणांच्या सीटवर फोर्थ सीट न दिल्यास ट्रेनमध्ये छान शब्दांचा भडिमार ऐकायला मिळतो. कधी कधीतर शब्दांचे भडीमार मारामारीपर्यंत पोहोचतात. पण यावर रेल्वे प्रशासनही काहीच करू शकत नाहीत.

फर्स्ट क्लासचे अंधश्रद्धाळू प्रवासी

पाचपट पैसे भरून आपल्याला सुरक्षित प्रवास मिळेल ही एक अंधश्रद्धा फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मानली जाते. कारण सेकंड क्लासमध्ये जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी फर्स्ट क्लासमध्येही असतेच. मग फर्स्ट क्लासचा सुखी प्रवास म्हणजे अंधश्रद्धाच आहे.

चालत्या ट्रेनमधून उतरणं अथवा चढणं

खरंतर चालत्या लोकलमधून चढू अथवा उतरू नये अशी सुचना नेहमीच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते पण खरंतर चालत्या लोकमधून चढल्या अगर उतरल्याशिवाय ट्रेनमधून प्रवासच केला नाही, असंच काहींना वाटतं.

पायदान म्हणजेच गेटवर बसणारे राजे

मोठ-मोठी बोजी घेऊन प्रवास करणाऱ्यांना रिकाम्या सीट्स कधीच दिसत नाहीत. ते आपलं ठाण दरवाज्यावरच मांडतात. मग इतरांनी त्यांना अजिबात हात-पाय न लागता खाली उतरायचं आणि चढायचं हासुद्धा एक अलिखित नियम आहे आणि हा नियम मोडणाऱ्यांवर गोड शब्दांची  स्तुतीसुमनं उधळली जातात. 

फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेनमध्ये फरक काय?

फास्ट आणि स्लो लोकलमध्ये काय फरक आहे याचं उत्तर आजही कित्येकांना मिळालेलं नाही. काही स्थानकं स्किप करून महत्त्वाच्या स्थानकावर थांबणारी फास्ट लोकल केव्हाच वेळेत आपल्या इच्छुक ठिकाणी पोहचत नसते, ही समजूत प्रवाशांनी मनाशी पक्की करून ठेवली आहे.

दरवाज्यातील लहानशी जागा

संपूर्ण ट्रेन खचाखच भरलेली असतानाही फक्त दरवाजाजवळ थोडीशी जागा करून तेथे उभे राहणारे आयुष्यात खूप मोठी मजल मारतात, अशीही समजूत या लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये आहे.

मोकळी ट्रेन एक नयनरम्य दृष्य

बँक हॉलिडेच्या दिवशी कामाला जाणारे ट्रेनमधून प्रवास करणारे स्वत:ला नशिबवान समजतात. कारण रिकामी ट्रेन कशी दिसते हे तरी त्यांना पाहता येतं. मग यादिवशी ते ट्रेनमधल्या सगळ्या सीट्सवरही बसून पाहतात. 

लोकलमधील सण आणि उत्सव

एखाद्या सण-उत्सवात घरातल्या महिला ज्याप्रमाणे आपलं घर रंगवतात त्याचप्रमाणे आपली नेहमीची ट्रेनही सजवतात. दिवाळीतला फराळ असो वा दसऱ्याच्या शुभेच्छा. काहीजणी तर खास ट्रेनमधल्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी नेहमीची लोकल पकडतात. 

बातम्यांचे लाईव्ह टेलिकास्ट

ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणतीही मालिका बघण्याची गरज नाही. ट्रेनमधल्या एखाद्या ग्रुपशी ओळख करून घ्या. कोणत्या मालिकेत काय चाललंय? कोण कसं वागतंय? कोणती मालिका बोअर आहे? कोणत्या मालिकेतल्या खलनायिकेची साडी कशी आहे,याबाबत इंत्यभूत माहिती तुम्हाला ट्रेनमध्ये मिळू शकेल. एकप्रकारे ट्रेनमध्ये लाईव्ह टेलिकास्टच सुरू असतो. 

टाईम मॅनेजमेंट

टाईम मॅनेजमेंटविषयी तुम्ही ऐकलं असेलच. ऑफिसमधून सुटल्यावर तिथेच जवळपास असणाऱ्या भाजी मंडईतून भाजी घ्यायची आणि ट्रेनमध्ये बसल्या बसल्या ती साफ करायची पद्धतच ट्रेनमध्ये रुढ झाली आहे. त्यामुळे  कोणाच्या घरात कोणती भाजी जास्तवेळा बनते याकडेही या महिला डब्यात चर्चा रंगतात. घरी जाऊन भाजी साफ करण्यात वेळ जाऊ नये म्हणून ट्रेनमध्ये बसूनच ही भाजी साफ केली जाते.

 

टॅग्स :मुंबईमुंबई उपनगरी रेल्वेप्रवास