Join us  

स्टारच्या प्रॉपर्टीच्या रंजक कथा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 2:42 AM

यानिमित्ताने बॉलिवूडवर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेते, अभिनेत्री यांच्या प्रॉपर्टीचा घेतलेला हा आढावा.

अभिनेता सनी देओल याच्या जुहू येथील बंगल्याच्या लिलावाची जाहिरात गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली आणि दुसऱ्या दिवशी तांत्रिक कारणांमुळे लिलाव थांबला देखील; पण यानिमित्ताने सिनेसृष्टी, त्यांची घरे, त्यांची कर्जे यांची सुरस चर्चा सुरू झाली. यानिमित्ताने बॉलिवूडवर अधिराज्य गाजविणाऱ्या या अभिनेते, अभिनेत्री यांच्या प्रॉपर्टीचा घेतलेला हा आढावा.

पाली हिल अन् सिनेसृष्टी१९६० च्या दशकात नर्गिस यांनी मरीन ड्राइव्ह येथे घर घेतले होते. तेव्हा त्याची खूप चर्चा झाली होती; मात्र त्यावेळीही मरीन ड्राइव्ह प्रॉपर्टीच्या बाबतीत आपले स्थान राखून होते. चित्रपटसृष्टीत आजच्यासारखा पैसा नव्हता. त्यामुळे अनेकांना मरीन ड्राइव्ह येथे घर घेण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागली; पण त्यानंतर राज कुमार यांनी वरळी सी-फेस येथे बंगला विकत घेतला आणि बॉलिवूडने वरळीच्या दिशेने मोर्चा वळविला; मात्र तिथे फार नवी बांधकामे नव्हती आणि जुन्या घरांची विक्री होत नव्हती. त्यामुळे बॉलिवूड मग सरकले ते वांद्र्याच्या दिशेने. कार्टर रोड आणि पाली हिल हे सिनेसृष्टीचे हक्काचे घर झाले. राजेंद्र कुमार यांच्यापासून ते राजकपूर, दिलीप कुमार, सुनील दत्त, साधना, नौशाद, गुलजार, भारत भूषण ते शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, रणबीर कपूर, आलिया भट अशा अनेकांची घरे तिथे आहेत.

राज कपूर यांच्या सगळ्याच घरांची विक्रीशोमन राज कपूर यांची चेंबूर येथे मोठी प्रॉपर्टी होती. त्यांचा प्रसिद्ध आर.के. स्टुडिओ आणि बाजूलाच एक बंगला देखील होता. त्यांच्या कुटुंबीयांनी मे २०१९ मध्ये २.२ एकरांवर वसलेल्या या स्टुडिओची विक्री २०० कोटी रुपयांच्या आसपास केली. तर त्याच परिसरात असलेल्या त्यांच्या बंगल्याची विक्री अलीकडेच झाली. ‘गोदरेज समूहा’ने १०० कोटी रुपयांच्या आसपास हा सौदा केल्याची चर्चा आहे. सुरुवातीची काही वर्षे चेंबूरला राहिल्यानंतर राज कपूर यांनी पाली हिल येथे ‘कृष्ण-राज’ हा बंगला बांधला. दिलीप कुमार यांच्या घराच्या अगदीच बाजूला हा बंगला होता. अलीकडेच त्यांचे चिरंजीव ऋषी कपूर यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी त्या बंगल्याची विक्री केली. तिथे आता आलिशान इमारतीचे काम सुरू आहे. त्या इमारतीच्या बाजूला असलेल्या एका त्याच प्रकारच्या आलिशान इमारतीमध्ये दोन फ्लॅटची विक्री तब्बल ११५ कोटी रुपयांना झाली आहे.

किशोर कुमार यांच्या घरात हॉटेलजुहू परिसरात किशोर कुमार यांचा ‘गौरी कुंज’ हा त्यांचा अतिशय लाडका बंगला होता. अत्यंत देखण्या पद्धतीने त्यांनी त्याची उभारणी आणि मांडणी केली होती. सध्या त्या बंगल्यामध्ये एका क्रिकेटपटूने तारांकित हॉटेल सुरू केले आहे.

अमिताभ बच्चन यांचे प्रेम जुहूवर अमिताभ यांच्या कारकिर्दीचा उदय झाला आणि तोवर पाली हिल परिसरातील जागांचे भाव गगनाला भिडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अमिताभ यांना पाली हिलऐवजी जुहूच्या दिशेने पुढे सरकावे लागले. अमिताभ यांनी जुहूमध्ये एकापोठापाठ एक तीन बंगले घेतले. ‘प्रतीक्षा’ आणि ‘जलसा’ हे त्यापैकी खुणेचे बंगले आहेत. जुहू बीचच्या दिशेने कधी जाणे झाले तर ‘बिग बीं’चा बंगला आवर्जून नजरेस पडतो. दिवसातून एकदा तरी अमिताभ बंगल्याच्या बाहेर येऊन आपल्या चाहत्यांना अभिवादन करतात.

शाहरूख खानचे स्वप्नदिल्लीतून शाहरूख खान जेव्हा बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमाविण्यासाठी आला तेव्हाच त्याने वांद्र्यात समुद्रकिनारी घर बांधण्याचे स्वप्न निश्चित केले होते. आज ताज लँड्स एण्ड या पंचतारांकित हॉटेलच्या बाजूला ‘मन्नत’ हा त्याचा भव्य बंगला त्याच्या चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

सुशांत सिंह अन् ‘ते’ घर कार्टर रोडवर एका आलिशान इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर अभिनेता सुशांत सिंह भाडेतत्त्वावर राहत होता. त्याच फ्लॅटमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर आतापर्यंत त्या फ्लॅटला ग्राहक मिळालेला नाही. सुशांत या फ्लॅटसाठी तब्बल पावणेपाच लाख भाडे भरत असल्याची चर्चा होती.

टॅग्स :सनी देओल