कारवाईत अडथळा; फेरीवाल्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:16 AM2017-07-19T03:16:55+5:302017-07-19T03:16:55+5:30
मशीद स्टेशनजवळ असणाऱ्या युसूफ मेहेर अली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असतानाच पालिकेच्या पथकावर फेरीवाल्याने हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मशीद स्टेशनजवळ असणाऱ्या युसूफ मेहेर अली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्याविरोधात कारवाई सुरू असतानाच पालिकेच्या पथकावर फेरीवाल्याने हल्ला केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी त्या फेरीवाल्यास अटक केल्यानंतर येथील बेकायदा फेरीवाले हटविण्यात आले.
युसूफ मेहरअली मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याच्या आणि त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच या मार्गावरील अनेक दुकानदारांनीही आपल्या दुकानापुढील रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाची बांधकामे करून अतिक्रमण केले होते. त्यानुसार या मार्गावर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर सामान ठेवून रस्ता अडविल्याचेही पालिकेच्या निदर्शनास आले. या दुकानदारांना त्यांचा माल उचलण्याची सूचना पालिका अधिकाऱ्यांनी केली.
एका दुकानदाराने कारवाईला विरोध करत सामान हटविण्यास नकार दिला. त्यानंतर सामान जप्त करण्यात येईल, अशीही सूचना त्या दुकानदारास देण्यात आली. मात्र त्याने महापालिकेच्याच पथकाला शिवीगाळ करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुकानदाराविरोधात पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने ९६ अनधिकृत फेरीवाले हटविले.