पॉर्न व्हिडिओ प्रकरण : २२ फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्न व्हिडीओप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोपडाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. शर्लिनच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत मुंबई पोलिसांनी तिला २२ फेब्रुवारीपर्यंत अटक करणार नाही, असे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले.
शर्लिन हिने एका पॉर्न वेबसाइटसाठी अश्लील कंटेंट तयार केल्याचा आरोप आहे. तिच्यावर आयटी ऍक्ट २००० अंतर्गत कलम ६७ आणि ६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
शर्लिन चोपडाच्या म्हणण्यानुसार, ती दोन कंपन्यांची संचालक आहे. ती एडल्ट वेबसाइटसाठी कंटेंट बनवते. एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आलेली वेबसाइट ही पायरेटेड आहे. कॉपिराइटचे उल्लंघन करण्यात आले आहे. सबक्रिप्शन असलेल्या वेबसाइटसाठी केवळ कंटेंट देत आहे आणि या पायरसीचे मी स्वतः पीडित आहे.
गेल्यावर्षी निवृत्त कस्टम अँड सेंट्रल एक्साइज अधिकारी मधुकर केणी यांनी शर्लिनच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सर्च इंजिनवर शर्लिनचे नाव टाइप केल्यावर केवळ अश्लील कंटेंटसमोर येतो. त्यांच्या तक्रारीवरून शर्लिनवर गुन्हा नोंदविण्यात आला.