मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. २८ ऑगस्टपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे ईओडब्लूएसला न्यायालयाने आदेश दिले आहे. कोरोना काळातील आर्थिक घोटाळा आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.
किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण
या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटक होऊ शकते. ही अटक टाळण्यासाठी त्यांना मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आता कोर्टाने २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, आता या प्रकरणात ईडीनेही उडी घेण्याचे संकेत दिले. याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची प्रत, तसेच आनुषंगिक कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्याची खरेदी चढ्या भावाने केल्याचा व त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याचा किशोरी पेडणेकर व मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप आहे. याच अनुषंगाने ५ ऑगस्टला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाकाळात पालिकेने मोठ्या प्रमाणावर बॉडी बॅगची खरेदी केली होती. त्यांची किंमत १५०० रुपये असतानाही खरेदी ६७०० रुपये दराने झाल्याचा आरोप आहे. २०२० मध्ये किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांच्या आदेशाने पालिका अधिकाऱ्यांनी १२०० बॉडी बॅगची खरेदी केल्याचा उल्लेख आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरमध्ये आहे. वाढीव भावाने खरेदी केलेल्या या सामानातील काही टक्केवारी आरोपींना मिळाल्याचा संशय असून, त्या अनुषंगाने आता तपास होत आहे.