पूररेषेच्या आतील निवासी अतिक्रमणांनाही मदत करणार - पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:56 AM2019-08-20T05:56:22+5:302019-08-20T05:56:37+5:30
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्तीसाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल. पूररेषेच्या आतील नुकसान झालेल्या घरांनाही ग्रामविकास विभागाच्या निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून देण्याच्या योजनेंतर्गत इतरत्र घर बांधून देण्यासाठी मदत केली जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी जाहीर केले.
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात नुकसान झालेल्या घरांचा इत्यंभूत आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंडे यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. पूरग्रस्त गावांमध्ये झालेल्या नुकसानीचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिले होते. आराखडा घेऊन सोमवारी चर्चा करण्यात आली. पूरग्रस्त भागातील गावांमध्ये ज्यांचे घर पडले आहे, ते ग्रामस्थ घर बांधत असतील, तर त्यांना १.५ लाख रुपये तत्काळ देण्यात येतील, असा निर्णयही घेण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
पुरामुळे ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालये, पंचायत समिती कार्यालये यांचेही नुकसान झाले आहे. काही भागात शाळा, वर्गखोल्या, अंगणवाडी इमारती पडल्या आहेत. याची माहिती घेऊन त्याच्या दुरुस्तीसाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक आठ दिवसांत पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत. या दुरुस्तीकामासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुकसानीची माहिती आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येईल, असे मुंडे यांनी सांगितले.