पकटीच्या वादात जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थी
By admin | Published: February 25, 2015 10:25 PM2015-02-25T22:25:35+5:302015-02-25T22:25:35+5:30
अलिबाग कोळीवाडा आणि साखर कोळीवाडा यांच्यातील वाद विकोपाला गेला असून यामध्ये आता थेट जिल्हाधिकारी मध्यस्थी करणार आहेत
अलिबाग : अलिबाग कोळीवाडा आणि साखर कोळीवाडा यांच्यातील वाद विकोपाला गेला असून यामध्ये आता थेट जिल्हाधिकारी मध्यस्थी करणार आहेत. दोन्ही कोळीवाड्यांतील प्रमुख प्रतिनिधींची बैठक २७ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे.
अलिबाग येथील कोळीवाडा परिसरात परंपरागत पकटी आहे. मासेमारी करण्यासाठी आणि मासेमारी करून आल्यावर या पकटीवर मच्छीमारांच्या होड्या लागतात.
याच पकटीच्या पलीकडे साखर कोळीवाडा आहे. येथील मच्छीमारही या पकटीचा वापर करतात. मात्र या पकटीचा वापर करताना साखर कोळीवाड्यातील मच्छीमारांची एकाधिकारशाही असल्याची तक्रार अलिबागमधील मच्छीमारांची आहे. त्यांचा हा वाद बऱ्याच कालावधीपासून धुमसत आहे. यातून मार्ग काढावा, यासाठी सातत्याने पोलिसांकडे अर्ज-विनंत्या केल्याचे अलिबागचे प्रकाश भगत यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकारी अलिबाग आणि साखर परिसरातील मच्छिमारांचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय देतील.
मंगळवारी सकाळी याच पकटीवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अलिबाग येथील मच्छीमारांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली असून जिल्हाधिकारी
२७ फेब्रुवारीला बैठक घेणार असल्याचे भगत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)