मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन

By रेश्मा शिवडेकर | Published: May 12, 2024 04:53 PM2024-05-12T16:53:22+5:302024-05-12T16:55:03+5:30

२०११-१२मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथमच अंतर्गत मुल्यमापनाचा ६०-४०चा पॅटर्न लागू कऱण्यात आला होता.

Internal assessment of 40 marks again from new year in University of Mumbai | मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन

मुंबई विद्यापीठात नवीन वर्षापासून पुन्हा ४० गुणांचे अंतर्गत मुल्यमापन

मुंबई - मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा ६०-४०चा पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून लागू होणाऱया या पॅटर्नमुळे ४० गुणांकरिता विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन स्तरावर (अंतर्गत) मूल्यमापन केले जाणार आहे. त्यामुळे वर्षाअखेर होणारी लेखी परीक्षा केवळ ६० गुणांची असेल.

२०११-१२मध्ये मुंबई विद्यापीठात प्रथमच अंतर्गत मुल्यमापनाचा ६०-४०चा पॅटर्न लागू कऱण्यात आला होता. परंतु, अंतर्गत मूल्यमापनात होणाऱया गैरप्रकारांमुळे त्यावेळी बीकॉमचा निकाल ८० ते ८५ टक्क्यांवर गेला होता. चौकशीअंती काही महाविद्यालयांनी अंतर्गत मुल्यमापनात सढळपणे गुणदान केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण २५ वर आणण्यात आले. त्यानंतर २०१६-१७मध्ये अंतर्गत मुल्यमापन पूर्णपणे बंद कऱण्यात आले. तेव्हापासून केवळ सेल्फ फायनान्स कोर्सेस आणि एलएलबी वगळता इतर अभ्यासक्रमांचे निकाल वार्षिक १०० गुणांच्या लेखी परीक्षेआधारेच जाहीर केले जात आहेत.

आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा एकदा हा पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. विद्यापीठाने त्या संदर्भात एक परिपत्रक जारी करत वार्षिक लेखी परीक्षा ६० गुणांची आणि अंतर्गत मुल्यमापन ४० गुणांचे असेल, असे स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांमध्ये स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे लागेल. पदव्युत्तर पदवी परीक्षांकरिता हा पॅटर्न ५०-५० असा असेल.

वर्गातील उपस्थिती वाढेल - वर्गातील उपस्थितीलाही अंतर्गत मुल्यमापनात गृहीत धरले जाते. विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी यामुळे वाढेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

स्वायत्त महाविद्यालयात अंमलबजावणी सुरू - स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये हा पॅटर्न आधीपासूनच राबविला जात आहे.

सातत्यपूर्ण मुल्यमापन- अंतर्गत मुल्यमापन प्रात्यक्षिके, प्रोजेक्ट, उपस्थिती, असाइनमेंट, टेस्ट यांआधारे ठरते. यामुळे वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मुल्यमापन होईल, अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

महाविद्यालये अनभिज्ञ - अजुनही काही महाविद्यालये या पॅटर्नबाबत अनभिज्ञ आहेत. मे-जून महिन्यात याबाबत स्पष्टता येईल, अशी महाविद्यालयांना अपेक्षा आहे.

Web Title: Internal assessment of 40 marks again from new year in University of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई