अंतर्गत गुणांबाबत समिती सकारात्मक, मात्र निर्णयाची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:54 AM2019-07-28T01:54:13+5:302019-07-28T01:54:22+5:30

शाळांच्या पहिल्या सत्रातील परीक्षा तोंडावर आहेत आणि अद्याप अंतर्गत गुणांच्या बाबतीतील कोणताच निर्णय शिक्षकांना न कळल्याने सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका कशा काढायच्या?

 Internal Quality Committee positive, but waiting for decision! | अंतर्गत गुणांबाबत समिती सकारात्मक, मात्र निर्णयाची प्रतीक्षा!

अंतर्गत गुणांबाबत समिती सकारात्मक, मात्र निर्णयाची प्रतीक्षा!

Next

मुंबई : इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयाला पुन्हा अंतर्गत गुण देण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने प्राथमिक स्तरावर सकारात्मकता दर्शविली आहे. तरी अद्याप या बाबतीतील अहवाल आणि निर्णय १५ दिवस उलटूनही समोर न आल्याने, शिक्षक-पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. शाळांच्या पहिल्या सत्रातील परीक्षा तोंडावर आहेत आणि अद्याप अंतर्गत गुणांच्या बाबतीतील कोणताच निर्णय शिक्षकांना न कळल्याने सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका कशा काढायच्या? विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन नेमके कोणत्या पद्धतीने करायचे, याबाबतीत शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे हा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या वर्षीपासून इयत्ता दहावीला भाषा आणि समाजशास्त्र विषयाला मिळणारे अंतर्गत गुण बंद केले. याच वेळी सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण सुरू असल्याने त्यांचा निकाल चांगला लागला. या संपूर्ण प्रकारात राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना फटका बसून, त्यांचा निकाल घटला. त्यामुळे चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही राज्यातील नामांकित ज्युनिअर कॉलेजांत प्रवेश मिळण्यासाठी स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी-पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, त्यांनी शिक्षण विभागावर संताप व्यक्त केला. जुलै महिना संपायला आला असून, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत कोणतेही आदेश न दिल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत आला आहे, तसेच अनेक शाळांमध्ये सराव परीक्षांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शिक्षकांना नेमका ८० गुणांचा पेपर काढावा की, १०० गुणांचा पेपर काढावा, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने अंतर्गत गुणांचा अहवाल आणि निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी शाळांकडून होत आहे.

समितीही स्थापन
शालेय शिक्षणमंत्री यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली इयत्ता नववी ते बारावीची विषयरचना व मूल्यमापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी २५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीला चर्चा करून, त्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागाला १० दिवसांत द्यायचा होता. या समितीच्या बैठकांवर बैठक होत असल्या, तरी अद्याप अंतर्गत गुणांच्या बाबतीतील अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.

Web Title:  Internal Quality Committee positive, but waiting for decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.