आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीला खर्च नामंजूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:57 AM2018-04-20T01:57:07+5:302018-04-20T01:57:07+5:30
कृषी विकास प्रकल्पातील गैरव्यवहार : अनियमिततेवर ठेवले बोट
गणेश देशमुख ।
मुंबई : थेट आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवून आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीने समन्वयित कृषी विकास प्रकल्पातील काही खर्च नामंजूर केल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. आर्थिक अनियमिततेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने निधी रोखणे ही राज्य सरकारसाठी निश्चितच भूषणावह बाब नाही.
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना उभारी देण्यास सरकारने हाती घेतलेल्या समन्वयित कृषी विकास प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफडीए)कडून कर्ज प्राप्त होत आहे. आयएफडीएच्या भारतातील ‘कन्ट्री प्रोग्राम मॅनेजर’ राशा ओमर यांनी महाराष्टÑ सरकारला ९ एप्रिल रोजी पाठविलेल्या ई-मेलमध्ये कृषी विकास प्रकल्पात झालेल्या आर्थिक अनियमिततेवर बोट ठेवले आहे.
कारवाईच्या सूचना
या गैरव्यवहारासंदर्भात कृषी व पणन खात्याचे अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हल्लीचे प्रकल्प संचालक तथा अमरावतीचे विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी यापूर्वी झालेल्या आर्थिक अनियमिततेबाबत मला माहिती दिली नव्हती. गुरुवारी मात्र त्यांनी अनियमितता असल्याचे सांगितले. त्यानुसार आर्थिक अनियमितेतेबाबत कारवाई करण्याच्या सूचना मी त्यांना दिल्या आहेत.
यशवंत नव्हे, मीरा वाघमारे!
सोलास प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या संस्थेच्या संचालक मंडळात पुण्याचे पशुधन विकास अधिकारी यशवंत वाघमारे यांच्या पत्नी मीरा यशवंत वाघमारे, विजया संपत खोमाने, मानसी भरडे आणि वैदेही विवेक भरडे यांचा समावेश आहे. पैकी मीरा यशवंत वाघमारे, विजया संपत खोमाने आणि गणेश चौधरी यांच्या पत्नी उज्ज्वला या स्वागत उद्योग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या संस्थेच्याही संचालक आहेत. समन्वयित कृषी विकास प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सोलासच्या वतीने यशवंत वाघमारे यांनी ‘महत्त्वपूर्ण’ भूमिका वठविली, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.
आयएफडीएचे आक्षेप
व्यवसाय प्रशिक्षण- महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्थेमार्फत बुलडाणा जिल्ह्यात प्रशिक्षणे घेतली गेली. मात्र नियमानुसार ही संस्था शासन मान्यताप्राप्त अथवा प्रधान मंत्री कौशल्यविकास योजनेंतर्गत संलग्न
नाही.
कीटमधील साहित्य
शाश्वत शेतीसाठी वितरित करण्यात आलेल्या कीटमधील साहित्य सर्वत्र एकसारखे असायला हवे. पण तसे ते नाही. सक्षम अधिकाºयाकडून कीट मंजूर करवून घेण्यात आलेली नाही. खरेदीसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ना कोटेशन मागविण्यात आले, ना करार करण्यात आला. नमूद करण्यात आलेल्या किमतीपेक्षा खरेदी किंमत अधिक दाखविली गेली.
फोडर कीट
सकस चारा निर्मितीसाठी पुरविण्यात आलेले बियाणे आणि पूरक साहित्य दर्जेदार नाही. शिवाय, या साहित्याच्या कीटमध्येही एकसारखेपणा आढळून येत नाही. करार न करणे, जादा रकमेत खरेदी करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे हे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.