Join us  

विकास महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

By admin | Published: May 04, 2017 6:22 AM

विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचलित विकास कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच

मुंबई : विक्रोळी येथील विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचलित विकास कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नुकतेच ‘जागतिक वर्तमान परिस्थितीत विज्ञान, समाजशास्त्र, मानवविद्या आणि तंत्रज्ञान यांचे एकात्मिक उपयोजन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अ‍ॅड. शरद चिटणीस होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इटली येथील कॅप्टन एफ्रिम झोविको, विल्सन महाविद्यालयाचे संचालक प्राचार्य डॉ. टी. ए. शिवारे, मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. विजय जोशी, प्राचार्य डॉ. टी. पी. मधू नायर, संस्थेचे अध्यक्ष प. म. राऊत, तसेच संस्थेचे सचिव प्रा. विनय राऊत उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे अध्यक्ष डॉ. आर. के. पात्रा यांनी परिषद आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा व अभ्यासक्रमांचा परिचय करून दिला. पुणे स्थित केंद्र शासन संचलित संशोधन संस्था एनसीसीएसचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांची बीजभाषण झाले.कॅप्टन एफ्रीम झोविको यांनी भारत व इटली यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याची गरज स्पष्ट करून, भारताचे एकूण देशांतर्गत उत्पादन हे ७-८ टक्के असण्याची शक्यता व्यक्त केली, तसेच ई-कॉमर्ससाठी भारत फार मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे, हेसुद्धा अधोरेखित केले.डॉ. टी. पी. मधू नायर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात ज्ञानाच्या सर्व शाखांचे एकात्मिक उपायोजनेद्वारे कौशल्य विकास करणे, विविध शैक्षणिक प्रकल्प राबविणे, आंतरशाखेय संशोधन या सर्व घटकांचा अंतर्भाव होत असल्याचे नमूद करीत, या सर्व घटकांच्या एकात्मिक समायोजनामुळे समाजास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो, असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. विजय जोशी यांनी उच्च शिक्षणासमोरील विविध समस्यांचा ऊहापोह केला व आंतरशाखीय संशोधनास अधिक महत्त्व द्यावे, असे सांगितले. डॉ. टी.ए. शिवारे यांनी भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने याविषयी विवेचन करताना कौशल्य विकास प्रकल्प हाती घेऊन, विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे अत्यंत गरजेचे असल्याचे नमूद केले. अ‍ॅड. शरद चिटणीस यांनी जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज व्यक्त केली. निरोप सत्राचे अध्यक्षस्थान संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या प. राऊत यांनी भूषविले, तर मुंबई विद्यापीठातील निरंतर शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शेवटी परिषदेच्या सहनिमंत्रक डॉ. सोनल उपाध्याय यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)