मुंबई : मुंबईत कोणीच उपाशी मरत नाही, असे म्हणतात. मुंबई प्रत्येकाला आपलेसे करते. प्रत्येकाचे पोट भरते. असाच एक दिव्यांग तरुण काही वर्षांपूर्वी मुंबईत दाखल झाला आणि एका झगमगत्या दुनियेतल्या मॉलमध्ये कामाला लागला. त्याला बोलता येत नाही. ऐकू येत नाही. पण तो हाताने खाणाखुणा करत, सांकेतिक भाषेत ग्राहकांना मनासारखी जेवणाची सेवा देतो. ग्राहकदेखील त्याच्या या मेहनतीवर खूश होत त्याचे पोट भरून कौतुक करतात. त्याचे नाव आहे मोदास्सिर जावेद सय्यद.
कुर्ल्यातल्या एका मॉलमध्ये फुड कोर्टमध्ये मोदास्सिर काम करतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून येथे काम करत असताना त्याने सगळ्या प्रकाराच्या व्यवहारांना आपलेसे केले आहे. एखाद्या खानपानाची व्यवस्था कशी सांभाळावी, हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. कारण त्याला ऐकू आणि बोलता येत नसल्याने तो खाणाखुणातून ग्राहकांची भाषा समजून घेतो. बरे यात तो चुका करत नाही.
एखादी चूक झालीच तर ग्राहकच त्याला सांभाळून घेतात हे विशेष. त्याचे सहकारीदेखील त्याच्या मदतीला असतात. शिवाय येथील व्यवहार कसे करावेत. ग्राहकांना कसे हाताळावे. खानपानाची व्यवस्था कशी करावी. थोडक्यात ग्राहक हाच राजा या भावनेने तो काम करतो. कोरोनामुळे मुंबईतले सगळे व्यवहार ठप्प पडले. तसे मॉलदेखील बंद पडले. दीड वर्ष काहीच नाही. तरीदेखील त्याने हार मानली नाही. त्याने सांकेतिक भाषा शिकण्यासाठी मेहनत घेतली. वेळप्रसंगी प्रशिक्षण घेतले. आज तो विक्रोळी येथे वास्तव्यास असून, आई, वडील, बहीण आणि भावंडे असे कुटुंब तो सांभाळत आहे हे विशेष.