मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन महोत्सव
By रेश्मा शिवडेकर | Published: March 11, 2024 06:59 PM2024-03-11T18:59:35+5:302024-03-11T19:00:17+5:30
संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे.
मुंबई : भारतीय विद्यापीठ संघ (एआययु) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात सोमवारी अन्वेषण या आंतरराष्ट्रीय संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
देशभरातील २८ विद्यापीठे या संशोधन महोत्सवात सहभागी झाली आहेत. विद्यार्थ्यांमधील नवकल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ओळखून त्यांना संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधील संशोधनवृत्तीला बळ देऊन राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील सहभाग वाढविणे अशा महत्वाकांक्षी उद्देशांसह या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा म्हणून या संशोधन महोत्सवाचे आयोजन केले जात होते. यावर्षी पहिल्यांदाच या संशोधन स्पर्धेची व्याप्ती वाढवून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सव म्हणून आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाला प्रथमच या महोत्सवाच्या आयोजनाचे यजमानपद मिळाले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. या संशोधन स्पर्धेत क्षेत्रनिहाय पूर्व क्षेत्रातून ६, पश्चिम १८, दक्षिण १८, उत्तर १८ आणि मध्य १० अशा पाच क्षेत्रातून एकूण ७० प्रकल्प प्राप्त झाले असून सादरीकरणासाठी एकूण १६७ विद्यार्थी सहभागी झाली आहेत.
विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नोलॉजी सभागृहात महोत्सवाचे उदघाटन पार पडले. कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी भारतीय विद्यापीठ संघाचे संयुक्त सचिव (संशोधन) डॉ. अमरेंद्र पानी, सहाय्यक संचालक (संशोधन) डॉ. उषा राय नेगी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा अन्वेषण, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन महोत्सवाचे निमंत्रक डॉ. सुनिल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.