मुंबई : भारतातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर बहुतांश देशांनी प्रवासबंदी शिथिल केली आहे. त्याचा फायदा घेऊन एअर इंडियाने आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरी उड्डाण महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध वाढविले असले तरी वंदे भारत अभियानांतर्गत एअर इंडिया पूर्ण क्षमतेने सेवा देत आहे. दुसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे आघाडीच्या देशांनी भारतीय प्रवाशांवर बंदी घातल्याने तेथील सेवा काहीकाळ स्थगित करावी लागली होती; मात्र निर्बंध शिथिल होताच प्रवाशांचा कल पाहून फेऱ्या वाढविण्यावर एअर इंडियाने भर दिला आहे. त्यानुसार उद्यापासून दिल्ली ते माले व्हाया मुंबई आणि केरळ ते माले या विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी ही नियोजित विमाने उड्डाण घेतील. त्याचप्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून क्वालालंपूरसाठी प्रमुख विमानतळांवरून विमाने नियोजित तत्त्वावर सोडण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.