उच्चशिक्षितांच्या आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 04:38 AM2017-08-15T04:38:46+5:302017-08-15T04:38:48+5:30

शाइन डॉट कॉमवरून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची माहिती गोळा करायची

An international job racket of highly educated students exposed | उच्चशिक्षितांच्या आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा पर्दाफाश

उच्चशिक्षितांच्या आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा पर्दाफाश

googlenewsNext

मुंबई : शाइन डॉट कॉमवरून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांची माहिती गोळा करायची. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना देशातील विविध विमान कंपन्यांत नोकरी लावण्याचे आमिष दाखवायचे. याच आमिषाला बळी पडलेल्या तरुण-तरुणींना नोंदणी, कागदपत्र तपासणी, प्रशिक्षण, राहण्याची व्यवस्था अशा विविध कारणांसाठी लाखोंची लूट करणाºया आंतरराष्ट्रीय जॉब रॅकेटचा विलेपार्ले पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचे दिल्लीतून सुरू असलेले कॉल सेंटर उद्ध्वस्त करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर यामागील मास्टर माइंड पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबईसह देशभरातील तरुण या रॅकेटच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे या रॅकेटमधील सूत्रधारापासून त्याच्यासोबत काम करणारे साथीदार उच्चशिक्षित आहेत. पंकज रविकुमार हांडा (२७), संजीव ब्रिजमोहन गर्ग (२२), अभिषेक विजेंद्र सिंग (२१), अजयकुमार जगदीश प्रसाद (२२), सुमन सौरभकुमार मख्खनसिंग (२७) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी अटक आरोपींची नावे आहेत.
जुलै महिन्यात या रॅकेटच्या जाळ्यात अडकलेल्या धवल पटेल (२४) या तरुणाने विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. धवलने एप्रिल महिन्यात आपली महिती ‘शाइन डॉट कॉम’ या संकेतस्थळावर टाकली. त्यानंतर जेट एअरवेजमध्ये नोकरी लागल्याचे सांगून त्याच्याकडून विविध प्रक्रियेच्या नावाखाली ३ लाख ३० हजार रुपये उकळले. पुढे त्याच्याशी संपर्क तोडला. धवलच्या तक्रारीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक गणोरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले, पोलीस उपनिरीक्षक आशिष कार्लेसह अंमलदार, उमेश गावडे, संतोष शिंदे, संदीप महाडेश्वर, सुरेश धोत्रे या पथकाने तपास सुरू केला.
तेव्हा तपासात या रॅकेटमधील टोळीने दिल्लीतील एटीएममधून पैसे काढल्याने या रॅकेटचे दिल्ली कनेक्शन समोर आले. तपास पथकाने दिल्लीत धाव घेतली. तेव्हा दिल्लीत जॉब रॅकेटसाठी त्यांनी कॉलसेंटर सुरू केल्याचे समोर आले. पथकाने कॉलसेंटरवर छापा टाकला. तेथून १३ हार्डडिस्क, १३ मोबाइल, ३ डेबिट कार्ड जप्त केले.
>८ महिन्यांत एका खात्यात २० लाख
गेल्या ८ महिन्यांपासून त्यांचे हे रॅकेट सुरू होते. या ८ महिन्यांत त्यांच्या फक्त एकाच खात्यात २० लाख रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली. अन्य खात्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यांनी हजारो तरुणांना चुना लावल्याचा संशय पोलिसांना आहे.
> जॉब रेट कार्ड
नोंदणी - सोळाशे ते २ हजार
कागदपत्र तपासणी - ५ हजार
आॅफर लेटर - १५ हजार ९००
दूरध्वनीवरून मुलाखत
- २० ते ३० हजार
प्रशिक्षण - २५ ते ३० हजार
आरोग्य विमा - ९ हजार
राहण्याची व्यवस्था
- ३० ते ४० हजार
नोकरी सुरक्षा - ३० ते ४० हजार
अशा विविध प्रक्रियेच्या नावाखाली पैसे उकळले जात होते.

Web Title: An international job racket of highly educated students exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.