आंतरराष्ट्रीय संगीत दिन : परिपूर्ण एकल वादन, वेगळ्या प्रकारचा आनंद देणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:08 AM2018-10-01T03:08:30+5:302018-10-01T03:08:46+5:30

जागतिक संगीत दिनानिमित्ताने दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे संगीताचे आंतरराष्ट्रीय स्वरूप दाखविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

International Music Day: The perfect single play, a different kind of enjoyment | आंतरराष्ट्रीय संगीत दिन : परिपूर्ण एकल वादन, वेगळ्या प्रकारचा आनंद देणारे

आंतरराष्ट्रीय संगीत दिन : परिपूर्ण एकल वादन, वेगळ्या प्रकारचा आनंद देणारे

Next

शिवाजी पार्क नागरिक संघाच्या बैठक कार्यक्रमात नेहमी वेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते. इतर ठिकाणाच्या कार्यक्रमांचा एक ठरावीक आणि विशिष्ट ढांचा असतो. त्यामुळे हे कार्यक्रम विशिष्ट वजनाने जातात. शिवाजीपार्क नागरिक संघाचे तसे नसते. त्यामुळे या बैठका ऐकताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. परवा या बैठकीच्या सुरुवातीला मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख डॉ. कुणाल इंगळे यांचे गायन झाले. ते नागपुरात कोंबळेसरांकडे शिकले आहेत. ते स्वत: संगीत दिग्दर्शक आहेत आणि रागदारीव्यतिरिक्त सुगम संगीत आणि गझलकडेही त्यांचा ओढा आहे.

या कार्यक्रमात त्यांनी सुरुवातीला मेघ राग ऐकविला. मेघ रागात एक गंभीर भाव आहे आणि गाणाऱ्याच्या आवाजात गांभीर्य असेल, तर परिणाम अधिकच गहिरा होतो. डॉ. कुणाल यांच्या धीरगंभीर आवाजात मेघ राग शोभून दिसला. ए बरखा रितु आयी हा बडा ख्याल अमीर खान खाँसाहेबांनी अजरामर केला आहे. डॉ. कुणाल यांनी त्याला व्यवस्थित न्याय दिला. मेघ रागानंतर त्यांनी पूरिया हा राग गायला. हाही गंभीर भावाचाच राग. डॉ. कुणाल यांनी त्यातले आलाप घेताना विशेष नजावत दाखविली. कविवर्य सुरेश भट यांची एक गझल त्यांनी रसीलपणे सादर केली. त्या गझलेवर मारवा रागाची छाया होती. अभय दातार (तबला) आणि निरंजन लेले (हार्मोनियम) यांची साथसंगत उत्तम होती. ज्येष्ठ हार्मोनियमवादन विश्वनाथ कान्हेरे यांचे एकलवादन या कार्यक्रमात झाले. कान्हेरे यांचे आपल्या वाद्यावर विलक्षण प्रभुत्व आहे. त्यांचा अनुभव दांडगा आहे. जितेंद्र अभिषेकी, राम मराठे, माणिक वर्मा यांच्यासारख्या चतुरस्त्र गायकांबरोबर साथ करून त्यांनी गाणे आपल्या अंगी मुरवून घेतले आहे. हे सर्व एकल वादनात डोकावते. त्यांनी श्याम कल्याण हा राग वाजविला. त्यातील खटक्याचे आणि कणस्वरांचे काम अप्रतिम होते. कान्हेरेंनी ‘नभ मेघांनी आक्रमिले’ हे पद छान रंगविले. स्वनिर्मित भिन्नकंस हा राग त्यांनी वाजविला. तो रंजक होता आणि एकल वादनाकडे त्यामुळे आणखी उठावदार वाटला.

आंतरराष्ट्रीय संगीत दिन
जागतिक संगीत दिनानिमित्ताने दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे संगीताचे आंतरराष्ट्रीय स्वरूप दाखविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जन्माने जपानी असलेले, पण भारतीय संगीतात बुडून गेलेले दोन वादक या मंचावर शनिवारी ६ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता एकत्र येणार आहेत. ताकाहिरो (संतूर) आणि सुजा नाकागावा (सारंगी) यांचे वादन ऐकायला मिळाणार आहे. नीलेश रणदिवे त्यांना तबला संगत करणार आहेत.

रागदारी
अमरेंद्र धनेश्वर

Web Title: International Music Day: The perfect single play, a different kind of enjoyment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई