प्रवासी संख्येत ९० टक्क्यांची घट; विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालातून उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशी पर्यटक आणि प्रवाशांनी कोरोनाकाळात मुंबईकडे पाठ फिरविली असून, गेल्या वर्षभरात मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत ९०.१० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे.
मुंबई विमानतळावरून वर्षाला जवळपास एक ते दीड कोटी आंतरराष्ट्रीय प्रवासी ये-जा करतात. २०१९-२० मध्ये येथील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या १ कोटी २३ लाख ५५ हजार ५५२ इतकी नोंदविण्यात आली होती. मात्र, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान मुंबई विमानतळावरून केवळ १२ लाख १८ हजार ५१२ प्रवाशांनी प्रवास केला.
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू केली असली तरी आंतरराष्ट्रीय वाहतुकीवरील निर्बंध आजही कायम आहेत. एअर इंडिया वगळता सध्या एकही विमान कंपनी पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय सेवा देत नाही. त्यामुळे विविध देशांतून भारतात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी प्रवासी संख्येत घट झाल्याचे दिसून येते. शिवाय सुरुवातीपासूनच कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर आल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी मुंबईकडे पाठ फिरवल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.
मुंबईपाठोपाठ व्यस्त विमानतळांच्या यादीत असलेल्या दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्याही कमी झाली आहे. दिल्ली ८२ टक्के, बंगळुरू ८९.८०, चेन्नई ८९.८०, कोलकाता ९५.१०, अहमदाबाद ९१.२०, हैदराबाद ८५.३० आणि गोव्यात दाखल होणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या संख्येत ९४.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
..........
राज्यातील विमानतळांची स्थिती
विमानतळ...... २०१९-२०..... २०२०-२१..... घट
मुंबई ........१,२३,५५,५५२............ १२,१८,५१२........ ९०.१० टक्के
पुणे .......१,५८,१२५ ..........४,८७८.......... ९६.९० टक्के
नागपूर ........१,१५,१७५ ...........३७१ ...............९९.७० टक्के