सोमवारपासून आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 07:17 AM2019-02-21T07:17:47+5:302019-02-21T07:18:14+5:30
पर्यटन विभागामार्फत सोमवारपासून मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’ होणार असल्याचे मंगळवारी वरळी येथील नेहरू सेंटरमधील कार्यक्रमात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
मुंबई : पर्यटन विभागामार्फत सोमवारपासून मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’ होणार असल्याचे मंगळवारी वरळी येथील नेहरू सेंटरमधील कार्यक्रमात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महोत्सवातून रामायणातील मूल्यांची जगभरातील लोकांना आणि नव्या पिढीला माहिती होईल, तसेच देशभरातील रामायण सर्किटच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, रामायण मालिकेतील सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री दीपिका चिखलिया, रामायणाचे अभ्यासक कविता काणे आदी उपस्थित होते.
रामायण सर्किटसाठी १२० कोटी
केंद्र शासनाने देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. राज्यातील रामायणाशी स्थळांच्या विकासासासाठी प्राथमिक टप्प्यात १२० कोटींची तरतूद केली आहे.
विविध देशांतील कलाकारांचा सहभाग
पर्यटन विभाग, एमटीडीसीमार्फत बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव होईल.यात भारतासह कंबोडीया, फिलीपाइन्स आणि इंडोनेशियातील कलाकार सहभागी होतील. त्या-त्या देशातील विविध स्वरूपांतील रामायणाचे सादरीकरण करतील.