मुंबई : बोरिवली पश्चिम येथील चिकूवाडी परिसरातील कित्येक वर्षे रखडलेल्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम या महिन्यात सुरू करण्यात येईल, असे ठोस आश्वासन महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नुकतेच बोरिवली येथे दिले. त्यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या ठिकाणी भेट दिली होती, त्यावेळेस त्यांनी हे आश्वासन दिले.
सदर १३ एकरच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय स्तराचे इनडोर खेळ संकुल, फुटबॉल मैदान, तरण तलाव, खेळाडूंसाठी हॉस्टेल, जॉगिंग ट्रॅक इत्यादी निर्माण करण्याची कल्पना आहे.तर पहिला टप्प्यात जॉगिंग ट्रेक, मुख्यद्वार आणि उद्यान निर्मिती करण्यात येणार आहे
सुनील केदार म्हणाले की, नवीन पिढीसाठी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या संदर्भात पाहणी करण्याकरिता, या राज्याचा क्रीडामंत्री म्हणून मी येथे आलेलो आहे. क्रीडाक्षेत्र हे एक असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये स्त्री-पुरुष समानता असते, जातीभेदाचे राजकारण होत नाही, गरीब-श्रीमंत हा भेद राहत नाही. फक्त गुणवत्तेच्या जोरावर माणूस पुढे जातो. या चिकूवाडी विभागातील रहिवाश्यांची आणि येथील स्थानिक नेत्यांची मागणी होती की, या विभागात शासनातर्फे प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, त्यानुसार हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यात या क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात येईल. यासाठी या विभागातील रहिवाशांनी, पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी एकत्र येऊन या कामामध्ये सहकार्य करावे, एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.