Join us

नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:02 PM

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असून आजच्या दिवशी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या २ महिन्याच्या बाळासह विधान भवनात हजेरी लावली.

मुंबई - आज जागतिक महिला दिन असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे. महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. क्रीडा असो वा उद्योग, गृहिणी असो वा राजकारणी या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांचा समावेश लक्षणीय आहे. त्यात एकाचवेळी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या या महिला आमदारांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. 

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असून आजच्या दिवशी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या २ महिन्याच्या बाळासह विधान भवनात हजेरी लावली. आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या की, आज मला आनंद होतोय, पहिल्यांदाच मी माझ्या २ महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनात माझे प्रश्न मांडायला उपस्थित आहे. विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेत यंदा आम्हाला हिरकणी कक्ष उपलब्ध करून दिला. हे माझे दुसरे बाळ आहे. याआधी पहिल्या बाळाला घेऊन मी विधानसभेत आले होते. परंतु त्यावेळी हिरकणी कक्ष उपलब्ध नव्हता अशी खंत त्यांनी मांडली. 

तसेच विधानभवनात हिरकणी कक्ष उभारला हे सकारात्मक पाऊल आहे. त्याचसोबत महिला दिनानिमित्त सगळ्या लक्षवेधी महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला त्याचा आनंद आहे. ही परंपरा यापुढेही चालूच राहू दे. प्रत्येक अधिवेशनात महिलांसाठी १-२ दिवस राखीव ठेवण्यात यावा. हिरकणी कक्ष यावा यासाठी सातत्याने मी पाठपुरावा केला. अनेक महिला आमदारांसाठी हा उपयुक्त कक्ष आहे असं आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार सरोज अहिरे यांनीही त्यांच्या ५ महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन विधानभवनात दाखल झाल्या होत्या. नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात अडीच महिने वयाच्या त्यांच्या बाळासाठी (प्रशंसक) हिरकणी कक्ष उभारलेला होता. यावेळी मुंबईच्या अधिवेशनातही तसाच कक्ष असावा, असे पत्र त्यांनी चार दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानुसार कक्षाची व्यवस्था केली होती पण सासू आणि बाळासह सरोज अहिरे त्या कक्षात गेल्या तेव्हा तेथील दुरावस्था पाहून त्या व्यथित झाल्या. त्यानंतर तातडीने हिरकणी कक्षात सर्व सोयीसुविधा पुरवण्यात आल्या. 

टॅग्स :जागतिक महिला दिनआमदार