मुंबई - १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून पाळला जातो. कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणा-या या दिवसाचे औचित्य साधून वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर ' आपली मोलकरीण ' संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने घरकामगार महिलांचा मेळावा उद्या दि,1 मे रोजी वर्सोवा विकास नगर येथे दुपारी २ वाजता आयोजित केला आहे. दरवर्षी कामगार दिनानिमित्त त्या घरकामगार महिलांचा मेळावा घेत असतात.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शिक्षणाची कमतरता यामुळे महिलांना घरमोलकरणीचे काम करावे लागते. जेवण, धुणी, भांडी, कपडे धुणे आदींमुळे त्या सतत पाण्यात काम करत असतात. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या त्वचेवर होऊन त्यांना निरनिराळ्या त्वचा रोगांना बळी पडावे लागते. घरकामगार महिलांना आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी महिला मेळाव्यात घरकामगार महिलांची आरोग्य तपासणी ठेवली आहे. तसेच या महिलांना होणा-या त्वचा विकारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे केली जाईल. घरकामगार महिलांना घरकाम करताना अनेक शारीरिक कष्ट पडतात. मात्र पुरेशा आहाराअभावी त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स मिळत नाहीत. ही गरज पूर्ण करण्यासाठी या आरोग्य शिबिरात त्यांना व्हिटॅमिन्सच्या गोळ्या देण्यात येतील. तसेच मोफत सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल पाऊचचे वाटप ' आमदार डॉ.लव्हेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता त्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन घरकामगार महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे देण्यात येणार आहे.
मोलकरीणींच्या समस्या, प्रश्न आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरवण्यासाठी आमदार डॉ.लव्हेकर कार्यरत आहेत. त्यांची ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक ' मासिक पाळीवेळी महिलांच्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करण्यासाठी झटत आहे. देशातील गरजू महिलांना 'ती सॅनिटरी पॅड बँके' च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. 'ती सॅनिटरी पॅड बँके' तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल पाऊचचे मोफत वाटप केले जाते.पॅड वुमन म्हणून ख्याती असलेल्या डॉ.भारती लव्हेकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून गेल्या 20 जानेवारी रोजी त्यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद यांनी त्यांचा गौरव केला होता.