Join us

दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:31 AM

यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना, ‘योग - स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी आहे.

मुंबई : मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीला एकूण ११६  शिव योग केंद्रे कार्यरत असून, या ठिकाणी जून २०२२ पासून ते मे २०२४ पर्यंत ३१ हजार ६२३  नागरिकांना योग प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या ४ हजार २७८ नागरिक योग प्रशिक्षणाचा लाभ घेत असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनाची संकल्पना, ‘योग - स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी आहे. योगामुळे केवळ वैयक्तिक आरोग्य सुधारत नाही. तर सामाजिक कल्याणासाठीही योगदान महत्त्वाचे आहे. योग हे वैयक्तिकवाढीसाठी आणि सामाजिक सुधारण्याचे साधन म्हणून प्रोत्साहन देते. ही बाब लक्षात घेत मुंबईतील नागरिकांच्या सुदृढ आरोग्याचे तसेच दर्जेदार जीवनशैलीसाठी शिव योगा केंद्रांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संपूर्ण मुंबईत विभाग स्तरावर शिव योगा केंद्रे सुरू केली आहेत. मागच्या वर्षी पालिकेकडून मुंबईत २४ विभागांत १०० सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये दोन हजार ५०० नागरिकांनी याचा सहभाग  घेतला. 

मुंबईतील सध्याच्या शिव योग्य केंद्रांना ही चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदा २१ जून २०२४  आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने संपूर्ण मुंबईतील विभागांमध्ये मिळून १००  प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यावर सकारात्मक परिणाम-

सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच जीवनशैलीशी निगडित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार इत्यादी आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधोपचारांच्या सोबतच आरोग्यदायी जीवनशैली व योगासनामुळे त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआंतरराष्ट्रीय योग दिन