Join us

इंटर्न्स वाढीव विद्यावेतनापासून वंचित

By संतोष आंधळे | Published: May 24, 2024 10:13 PM

महापालिका वैद्यकीय महाविद्यलयातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष  

मुंबई : राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन अनुदानित आणि शासनाच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न्सना ( आंतरवसिता ) फेब्रुवारी महिन्यात विद्यावेतन वाढीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणात शासनाच्या सर्व महाविद्यालयात निर्णय लागू झाला असून त्या ठिकाणच्या इंटर्न्सना नव्याने वाढविण्यात विद्यावेतन देण्यास सुरु केले आहे. मात्र महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाच वैद्यकीय महाविद्यातील इंटर्न्सना अद्यापही ही वाढ देण्यात न आल्याने त्या सर्व इंटर्न्सनमध्ये रोष व्यक्त करण्यात आहे. ते गेले काही महिने या विद्यावेतन वाढीपासून वंचित राहिले आहे.    

मुंबई महापालिकेच्या अखत्यारित पाच वैद्यकीय महाविद्यलय येत असून  त्यामध्ये नायर, नायर दंत, सायन, के इ एम,  कूपर रुग्णायाशी संलग्न महाविद्यालयाचा समावेश आहे. यामध्ये सध्याच्या घडीला एकूण ८०३ इंटर्न्स आहेत. या इंटर्न्सना प्रतिमहिना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत होते. मात्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मार्च महिन्यात हे विद्यावेतन वाढवून १८००० रुपये केले. वाढीव विद्यावेतन सर्व शासनाच्या महाविद्यलयात लागू झाले आहे. मात्र महापालिकेच्या विद्यार्थ्यांना अजूनही ११००० रुपयेच दिले जात आहे. त्यामुळे या इंटर्न्स मध्ये कमालीची नाराजी आणि असंतोष व्यक्त केला जात आहे.  

याप्रकरणी राज्य वैद्यकीय इंटर्न्स संघटनेचे सहसचिव डॉ अभिनव वाघ यांनी सांगितले कि, " शासनाने २७ फेब्रुवारीला जी आर काढून इंटर्न्सना नव्या वाढीप्रमाणे विद्यावेतन द्यावे असे सांगितले होते. मात्र महापालिकेने अद्यापही नवीन वाढ लागू केली नाही. आम्ही त्यांना वेळेतच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबत निवेदन दिले आहे. राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाढीव विद्यावेतन सुरु करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाची ही दिरंगाई आहे, ज्याचा फटका पाच महाविद्यालयातील इंटर्न्सना बसला आहे. ४ जुन पर्यंत महापालिका प्रशासनाने यावर ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.  

शासनाने वाढीव विद्यावेतनाचा निर्णय घेतला. मात्र तो जसाच्या तसा आम्हला तात्काळ लागू करता येत नाही. याकरिता आमच्याकडे महापालिका ठराव व्हावा लागतो. त्यासाठी आम्ही सुद्धा प्रस्ताव तयार केला असून तो सर्व प्रक्रियेतुन पुढे जात असतो. त्यांनाही विद्यावेतन वाढू लागू होईल. काही वेळा आचारसंहितेमुळे निर्णय घेता येत नाही. त्यांना फेब्रुवारी पासूनच अरिअर्स लागू होईल. आम्ही ज्यावेळी विद्यार्थ्यांचे निवेदन प्राप्त झाले त्यावेळी प्रस्ताव तयार करून पाठिवला आहे, विद्यार्थ्यांनी सुद्धा समजूतदार पणाची भूमिका घेतली पाहिजे.       डॉ निलीमा अंड्राडेसंचालिकामहापालिका वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :मुंबई