पदविका अभ्यासक्रमाच्या ६७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 01:22 AM2020-01-30T01:22:13+5:302020-01-30T01:22:25+5:30

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांकरिता ‘आय स्कीम’ अभ्यासक्रम सुरू केला आहे.

 Internship for over 3,000 students of the Diploma Course | पदविका अभ्यासक्रमाच्या ६७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप

पदविका अभ्यासक्रमाच्या ६७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप

Next

मुंबई : अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सक्तीची केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या ‘आय स्कीम’ अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनीही सहा ते आठ आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल ६७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी इंटर्नशिप पूर्ण केल्याची माहिती राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमांकरिता ‘आय स्कीम’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीसाठी चौथ्या सत्रानंतर सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य आहे. हा अभ्यासक्रम उद्योग प्रतिनिधी, तज्ज्ञांनी मिळून तयार केला आहे. इंटर्नशिपच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी नेमके कसे काम करावे, त्याचे मूल्यमापन कसे करावे, याच्या सूचनाही विद्यार्थी आणि उद्योगसमूहांना देण्यात आल्याची माहिती राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाने इंटर्नशिपची सक्ती केली आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देणेही सरकारचे कर्तव्य आहे, या उद्देशाने हा विशेष पुढाकार घेण्यात आल्याचे राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र तयार केले होते. या केंद्रात तेथील उद्योगांचा तपशील मागविण्यात आला होता. यानंतर, तेथे कोणत्या उद्योगाला कोणत्या शाखेचे विद्यार्थी हवे आहेत, याची माहिती घेऊन त्यानुसार विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. आजही उद्योगाला डिप्लोमाधारक उमेदवार हवे आहेत. यामुळेच इंटर्नशिपचा प्रस्ताव जाताच सुमारे १० हजारांहून अधिक उद्योगांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊ केल्याची माहिती डॉ.वाघ यांनी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, संचालनालयाच्या ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत तंत्रशिक्षण संचालनालय २ लाख ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असून, पुढील काही महिन्यांत हा आकडा आणखी वाढणार असल्याची माहितीही डॉ.वाघ यांनी दिली.

रोजगाराच्या संधीची माहिती
राज्यातील अभियांत्रिकी, पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, या अभ्यासक्रमांची माहिती तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने तंत्रशिक्षण संचालनालयाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत शाळेत संवाद साधण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणाºया रोजगार संधींची माहिती दिली जाते.

Web Title:  Internship for over 3,000 students of the Diploma Course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.