Join us  

खारघरमध्ये आंतरराज्यीय बस टर्मिनस

By admin | Published: May 04, 2016 3:38 AM

खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे आंतरराज्यीय बस टर्मिनस उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या

- कमलाकर कांबळे, नवी मुंबई

खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे आंतरराज्यीय बस टर्मिनस उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पुढील दोन वर्षांत हे टर्मिनस तयार करण्याची सिडकोची योजना आहे.मागील दहा वर्षांत परराज्यातून शहरात येणाऱ्या परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत. या बसेसना अधिकृत थांबे नसल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, सीबीडी आणि कळंबोली आदी ठिकाणांहून प्रवासी घेतात. शहरात येणाऱ्या या प्रवाशांच्या दृष्टीने हे असुरक्षित व गैरसोयीचे असल्याने परराज्यातून येणाऱ्या शासकीय उपक्रमांच्या बसेसना एक अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनस उभारण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी खारघर येथे जागा निश्चित करण्यात आली आहे.या प्रकल्पासाठी २0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात टर्मिनसची भव्य इमारत, कॅन्टिंगची सुविधा, बसेससाठी क्यू आकाराचे शेल्टर्स, पार्किंग तसेच टॅक्सी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आदी सुविधा असणार आहेत.वाढत्या लोकसंख्येची गरज : २0११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे. पायाभूत सुविधा विकसित करताना सिडकोने २0३१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. त्यानुसार २0१३ मध्ये शहराची लोकसंख्या ४0 लाखांच्या घरात जाईल, असा ढोबळ अंदाज आहे. तसेच पुढील वीस वर्षांत जवळपास १४ लाख रोजगार निर्मिती होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काळात रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून येणाऱ्या परिवहन सेवेच्या बसेसचे आतापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे.