मुंबई - अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा महत्वाचा असलेला गोखले पूल 7 नोव्हेंबर 2022 पासून बंद असल्याने अंधेरीकर नागरिकांना आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. 2 जुलै 2018 रोजी या पूलाचा पादचारी भाग कोसळल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता.
पालिकेच्या भागातील पूलाच्या बांधकामाची वर्क ऑर्डर मार्च 2020 मध्ये देण्यात आली होती,तर प्रत्यक्षात काम 18 महिन्यांच्या विलंबाने नोव्हेंबर 2021 मध्येच सुरू झाले.पावसाळ्यापूर्वी किमान एक लेन कार्यान्वित केली जाईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते.
मात्र आता चंदीगड येथील गर्डर उत्पादन स्टील कारखान्यात संप असल्याने आता गोखले पूलाच्या दोन मार्गिका 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे,तो समर्थनीय नाही.त्यामुळे अंधेरीकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि गोखले पूल लवकर सुरू करण्यासाठी हस्तक्षेप करा असे पत्र अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार अमित साटम यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.
पावसाळ्यापूर्वी किमान एक लेन कार्यान्वित केली जाईल असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले होते. काल आपण पालिका अधिकाऱ्यां समवेत या पूलाच्या साईटची पाहणी केली.मात्र पालिकेने आपला गृहपाठ नीट केला नव्हता आणि मान्सूनपूर्व एक लेन सुरू करण्यापूर्वीचे त्यांचे तथ्य समजले. दुसरे म्हणजे काल माझ्यासमोर मांडलेल्या तथ्यांवरून असे दिसते,की स्टीलच्या वितरणात जास्तीत जास्त 3 महिन्यांचा विलंब झाला आहे जो पूलाची एक लेन उघडण्यास 5 महिन्यांचा विलंब होईल हे समर्थनीय नाही. पालिकेच्या भागातील पूल पूर्ण होण्याशी आणि स्टील वितरणाचा काहीही संबंध नसून पालिका या कामाबद्दल गंभीर आणि वचनबद्ध नव्हती असा आरोप आमदार अमित साटम यांनी आपल्या पत्रात केला आहे.
बांधिलकी आणि टाइमलाइनचे पालन न केल्याबद्दल अर्थ व्यवसायाला खिळ बसली आहे. अशी गंभीर वृत्ती खपवून घेतली जाणार नाही हे पालिका प्रशासनाला दाखवण्याची वेळ आली आहे अशी टिका त्यांनी केली.