Join us

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा! आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 12:42 PM

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई : मुंबईत अद्याप कुठल्याही रस्त्यांची कामे सुरू झालेली नसताना, कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देणे हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय ठरेल. जोपर्यंत रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत कोणालाही आगाऊ रक्कम देता कामा नये. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात आपण हस्तक्षेप करावा आणि कंत्राटदारांना देण्यात येणारी ६०० कोटी रुपयांची आगाऊ रक्कम त्वरित रोखावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिकेने केवळ आपल्या पत्राचे उत्तर दिलेले आहे. 

महापालिकेचे हे उत्तर म्हणजे संदर्भहीन स्पष्टीकरण आहे. मात्र महापालिकेतील भ्रष्टाचार थांबलेला नाही. त्यामुळे रस्त्यासंदर्भात जारी केलेले टेंडर रद्द करावे आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची समिती किंवा निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून  नव्याने टेंडर जारी करावे, अशी मागणी आदित्य यांनी राज्यपालांकडे केली. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिकासरकार