...म्हणून मोदींना तुम्ही आंबे कसे खाता? असा प्रश्न विचारला; अक्षय कुमारने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:05 AM2019-12-18T10:05:31+5:302019-12-18T10:07:29+5:30
मुलाखतीमध्ये मोदींना दिलखुलास उत्तरे देत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॅालिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्येनरेंद्र मोदी यांना अनेक प्रश्न विचारले होते. मात्र यामध्ये एक असा प्रश्न होता की त्यानंतर अक्षय कुमारवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी टीका केली. तसेच नेटकऱ्यांनी देखील अक्षय कुमारला चांगलेच धारेवर धरले होते. तो प्रश्न म्हणजे तुम्ही आंबे कसे खाता?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अक्षय कुमाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली होती. अराजकीय स्वरुपाची अशी ही मुलाखत होती. राजकारणापलीकडे जाऊन मोदींच्या खासगी आयुष्याविषयी या मुलाखतीतून जाणून घेण्यात आले. या मुलाखतीमध्ये मोदींना दिलखुलास उत्तरे देत मनमोकळेपणाने गप्पा मारल्या होत्या. परंतु अक्षय कुमार यांनी मोदींना तुम्ही आंबे कसे खाता, कापून की चोखून? असा प्रश्न विचारल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. पंतप्रधानांनी एका कलाकाराला मुलाखत दिल्याने विरोधकांनी देखील जोरदार निशाणा साधला होता. मात्र अक्षय कुमार याने मोदींना हा प्रश्न का विचारला याचे स्पष्टीकरण दिले आहे.
शास्त्र असतं ते... देधडक कायदे करणाऱ्या अमित शाहांना अक्षय कुमारचा मोलाचा सल्ला!
अक्षय कुमार आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, मी नरेंद्र मोदींना तुम्ही आंबा कसे खातात असा प्रश्न विचारल्याने मला ट्रोल केले गेले. पण मी यामध्ये संशोधन काय करायचं? माझ्या जे मनात आलं ते मी त्यांना विचारलं. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी ते आंबा खाऊ शकत नाही का? तसेच मजाक, मस्ती करु शकत नाही का असा सवाल देखील अक्षय कुमारने ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना विचारला आहे.
अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. अक्षय कुमारने मोदींना पण काय प्रश्न विचारला तर आंबा खाता का? असा प्रश्न विचारण्याची कुठल्या पत्रकाराचीही हिम्मत झाली नसती असं म्हणत निशाणा साधला होता. हा काय पंतप्रधानांना विचारायचा प्रश्न आहे. चोखून खाता का? कापून खाता का? काय मजाक लावला आहे. इथे जनता सरकारवर अवलंबून आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी अक्षय कुमारच्या मुलाखतीवर टीका केली होती.