मोबाइलच्या प्रकाशात अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 02:28 AM2019-01-09T02:28:59+5:302019-01-09T02:29:45+5:30

मुलुंडमधील धक्कादायक चित्र : प्रशासनाची टोलवाटोलवी

Interview with mobile light | मोबाइलच्या प्रकाशात अंत्ययात्रा

मोबाइलच्या प्रकाशात अंत्ययात्रा

Next

मुंबई : स्मशानभूमीजवळील रस्त्यांच्या कामादरम्यान विद्युत खांबाची केबल लाइन तुटलेली. २० हून अधिक विजेच्या खांबांवरील दिवे बंद पडलेले. अशात रात्री-अपरात्री निधन झालेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेसाठी स्थानिकांना मोबाइल टॉर्चचा आधार घ्यावा लागत असल्याची परिस्थिती मुलुंडमध्ये निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासन एकमेकांवर बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनी परिसरात असलेल्या या स्मशानभूमीचा वापर सर्व धर्मीयांसाठी होत आहे. म्हाडा कॉलनी, नवघर रोड, टाटा कॉलनीतील १० हजारांहून अधिक नागरिक या स्मशानभूमीचा वापर करतात. येथील स्मशानभूमीबाहेरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नीव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने हाती घेण्यात आले. कामादरम्यान केबल लाइन तुटली आणि या परिसरातील विद्युत खांबांवरील दिवे बंद पडले. गेल्या महिनाभरापासून म्हाडावासीयांना अंधाऱ्या वाटेतून ये-जा करण्याची वेळ ओढावली. १५ दिवसांपूर्वी म्हाडा वसाहतीत अपघातात एका तरुणाचे निधन झाले. मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात त्या तरुणाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
म्हाडा कॉलनी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या विद्युत दिव्यांबाबत संबंधित प्रशासनाकडे गेल्या १५ दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र रस्ते विभाग महावितरणकडे बोट दाखवत आहे. तर महावितरण रस्ते विभागाकडून खर्च मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दोघांच्या अंतर्गत वादाचा फटका स्थानिकांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळी केबल तुटली त्याचवेळी महावितरणने काम थांबवून वसुली करणे गरजेचे होते, असेही त्यांनी नमूद केले.
म्हाडा कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक विलास परब यांनीही याबाबत संताप व्यक्त करत आहेत़

अंधारात गर्दुल्ले, रोडरोमियो...
च्अंधारामुळे गर्दुल्ले आणि रोडरोमियोंचा वावर या परिसरात सुरू झाला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना याचा फटका बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दिवे आधीपासून बंद
कामापूर्वीच बरेचसे दिवे बंद होते. याबाबत महावितरणकडे लेखी पत्र पाठविण्यात आले आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच दिव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.
- राठोड, रस्ते विभाग अधिकारी, घाटकोपर

रस्त्यांचे काम करतानाच कनेक्शन तुटले...
रस्त्यांचे काम सुरू असताना, जेसीबीमुळे केबल वायर तुटली आणि परिसरातील दिवे बंद पडले. दिवे आधीपासून बंद नव्हते. त्यामुळे संबंधित विभागाने त्याचा खर्च भरून देणे गरजेचे आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.
- सारिका खोब्रागडे,
कार्यकारी अभियंता, मुलुंड, महावितरण

Web Title: Interview with mobile light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई