Join us

राऊतांचा सवाल, नारायण राणे अन् छगन भुजबळांबद्दल उद्धव ठाकरेंचे 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 8:56 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या दैनिकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे जुने नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यावर जास्त बोलणे टाळले. पण,

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या दैनिकासाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेचे जुने नेते छगन भुजबळ आणि नारायण राणे यांच्यावर जास्त बोलणे टाळले. नारायण राणेंबद्दल तर काहीही न बोलल्याचे उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून दिसून आले. त्याऐवजी भाजपला उपहासात्मकपणे त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या मुलाखतीवरील प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी परखडपणे उत्तरे दिली. यावेळी, नारायण राणे पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेत ? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर, मी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच छगन भुजबळ यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर तुम्हाला पेढे पाठवले. ज्या छगन भुजबळांनी शिवसेनेविरोधात, शिवसेनाप्रमुखांविरोधात वातावरण निर्माण केले. किंबहुना त्रास देण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्यांना तुम्हाला पेढे पाठवावे लागले. यावर बोलताना, अनुभवातून जर त्यांना गोडपणा आला असेल तर मी काय करु असे उत्तर उद्धव यांनी दिले. त्यामुळे एकंदरीतच स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे आणि छगन भुजबळ यांबाबत अधिकचे बोलणे उद्धव ठाकरेंनी टाळल्याचे दिसून आले. 

या मुलाखतीतील उद्धव ठाकरेंचे मुद्दे -

* बाळासाहेब नेहमी सांगायचे मी बीटवीन द लाईन्स वाचतो. मीही तेच करतो. पण, बातमी देणाऱ्यांनी बातमीत कमेंट देऊ नये बातमी ही बातमी असावी. कॉमेंट लिहिण्यासाठी तुम्ही अग्रलेख लिहू शकता.

* प्रत्येक गोष्टीचा उपयोग, दुरुपयोग आणि निरुपयोग असतो. त्यामुळेच सोशल मीडियाचाही जो उपयोग करेल त्यास त्याचा फायदाच होईल. काळाप्रमाणे तंत्रज्ञान विकसीत होतयं, असं मला वाटतं. 

* मला फोटोग्राफी खूप आवडते, मी गतवर्षी माझ्या फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवलं होत. या प्रदर्शनातून जवळपास 5 कोटी रुपये जमा झाले. मी तो पैसा शेतकऱ्यांसाठी वापरला. 

* तुम्ही पदवीधर आहात का? या प्रश्नावर हाताच्या बोटावरील खूण दाखवत हेच उत्तर असेच उद्धव यांनी सूचवले. त्यावर, पदवीधर मतदारसंघासाठी केलेल्या मतदानाची ही खूण आहे का, असेही संजय राऊत यांनी विचारले.

* दुसऱ्या बॉसची चाटुगिरी करण्यापेक्षा स्वत: बॉस झालेलं मला केव्हाही आवडेल, असे म्हणत मित्रपक्षांवरही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

* देशातील आणि राज्यातील भ्रष्टाचाराच्या लढाईत राज्यकर्ते गंभीर नसल्याचे उद्धव यांनी मान्य केले आहे. केवळ भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, पण सिद्ध काहीही होत नाही. आधी सिद्ध करुन दाखवा मग बोला, असेही उद्धव यांनी म्हटले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनारायण राणे संजय राऊत