मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामासाठी चेन्नईत मुलाखती, त्याला मुख्यमंत्र्यांच्या सहमती? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:51 PM2022-09-21T14:51:26+5:302022-09-21T14:52:12+5:30
Aditya Thackeray: मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामासाठी चेन्नईमध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे, काम मुंबईत असेल, तर मुलाखती राज्याबाहेर चेन्नईत कशासाठी, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती आहे का, अशी विचारणा करत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे.
मुंबई - वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यापासून रोजगाराच्या मुद्द्यावरून शिवसेना राज्य सरकारविरोधात कमालीची आक्रमक झाली आहे. दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील एका कामासाठी चेन्नईत मुलाखती होत असल्याचा गौप्यस्फोट करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.
मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामासाठी चेन्नईमध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे, काम मुंबईत असेल, तर मुलाखती राज्याबाहेर चेन्नईत कशासाठी, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती आहे का, अशी विचारणा करत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, वर्सोवा-वांद्रे सीलिंकचं काम वेगळ्या कंत्राटदाराला दिलं गेलं आहे. या कामासाठी सिव्हील इंजिनियर्सची आवश्यकता आहेत. त्यासाठी चेन्नईत मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या कामासाठी मुंबई आणि महाराष्ट्रात मुलाखती का घेतल्या जाणार नाहीत, याचं उत्तर मिळालं पाहिजे. काम मुंबईत असूनही त्यासाठीच्या भरतीची महाराष्ट्रात जाहिरात देण्यात आलेली नाही. हे सारं मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हे होतं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे.
दर्जेदार कर्मचाऱ्यांची निवड करणे हा कंपनीचा अधिकार आहे. मात्र आपल्याकडे इंजिनियर्सची कमतरता आहे का? तसेच कुठलीही वाच्यता न करता चेन्नईत मुलाखती का होत आहेत. या मुलाखतींच्या जाहिरातीही महाराष्ट्रात आलेल्या नाहीत. मुंबईतलं काम असेल तर त्याच्या मुलाखती महाराष्ट्रात का नाही याचं उत्तर संबंधितांनी दिलं पाहिजे. तसेच केवळ केवळ एकाच ठिकाणी मुलाखती कशासाठी घेतल्या जात आहेत. देशाच्या अन्य भागात मुलाखती झाल्या असत्या तर हरकत नव्हती. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना काम नाही मग चेन्नईत मुलाखती कशासाठी घेतल्या जात आहेत. या मुलाखती २५ सप्टेंबर रोजी चेन्नईत होणार आहेत. त्या मुलाखतींना जाण्यासाठी राज्य सरकार तिकीट काढून देणार का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.