मुंबई : मुंबई विद्यापीठाने सप्टेंबरअखेरीस परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र या मुलाखतींनंतरही निवड समितीने संचालकपदी योग्य असलेल्या उमेदवाराचे नाव सुचविले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर सवाल उपस्थित झाला असून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याच्या चर्चा सुरूझाल्या. या चर्चा सुरू असतानाच आता मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी नव्याने जाहिरात काढली आहे. वर्षभरापासून या पदाचा भार प्रभारी असल्याने विद्यार्थ्यांकडून वेळोवेळी तक्रारी मांडून याबाबत संताप व्यक्त हाेत आहे. त्यामुळे वारंवार होणारा गोंधळ थांबविण्यासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नियुक्ती करा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांच्या मुलाखतीनंतरही कोणत्याही उमेदवाराच्या नावाची शिफारस न केल्याने आता याप्रकरणी विद्यार्थी संघटनांच्या भुवया उंचावल्या आहेत, या मागे राजकीय इच्छाशक्तीमुळे अडथळा आल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
- मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. - आता या नव्या निवड प्रक्रियेतून संचालकपदी योग्य व्यक्तीची पूर्णवेळ निवड करण्यात येईल अशी अपेक्षा विद्यार्थी संघटनांनी व्यक्त केली आहे.
या पदांसाठी अर्जपरीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासह-अनुदानित – खुला प्रवर्ग, विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील म्हणजेच ‘आयडॉल’चे संचालकपद -विनाअनुदानित – खुला प्रवर्ग), प्राध्यापक संगणक शास्त्र विभाग- विनाअनुदानित – खुला प्रवर्ग, प्राध्यापक माहिती व तंत्रज्ञान विभाग विनाअनुदानित– खुला प्रवर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी नवशोधन केंद्र- विनाअनुदानित– खुला प्रवर्ग या पदांसाठी अर्ज मागविले आहेत.