धाकधूक यशापयशाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 02:12 AM2018-05-29T02:12:06+5:302018-05-29T02:12:06+5:30

दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की, वेळापत्रकाआधी विद्यार्थ्यांना निकालाचे टेन्शन येते. गेल्या काही वर्षांत निकालाचा टक्काही वाढल्याने स्पर्धा अटीतटीची झाली आहे

Intimacy! | धाकधूक यशापयशाची !

धाकधूक यशापयशाची !

Next

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की, वेळापत्रकाआधी विद्यार्थ्यांना निकालाचे टेन्शन येते. गेल्या काही वर्षांत निकालाचा टक्काही वाढल्याने स्पर्धा अटीतटीची झाली आहे. परिणामी, या स्पर्धेमुळे यशापयशाच्या भीतीने विद्यार्थ्यांच्या मनात घर केले आहे. मात्र हीच निकालाची भीती विद्यार्थ्यांनी मनातून काढत गुणांच्या स्पर्धेत न अडकता नव्या उमेदीने, सकारात्मकतेने भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे.
केवळ दहावी-बारावी नव्हे, तर अन्य परीक्षांच्या स्पर्धेच्या प्रक्रियेतही पालकांनी महत्त्वाची भूमिका घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण न देता, अपेक्षांचे ओझे न लादता परीक्षा म्हणजे आयुष्य नव्हे हे समजावून सांगितले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ ‘परीक्षा’ ही व्याख्या मोडीत काढून त्यापलीकडे येणारे यश-अपयश, अनुभव बरेच काही शिकवित असतात हा दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित केला पाहिजे. गेल्या काही दिवसांत दहावी आणि बारावीच्या निकालांच्या तारखा अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यातून अनेकांची तारांबळ उडाली, अनेक जण घाबरलेही. मात्र या प्रक्रियेत सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्यातील सत्यता पडताळली पाहिजे. निकाल लागण्यापूर्वी पालकांनी विद्यार्थ्यांची साथ दिली पाहिजे. जेणेकरून अन्य विद्यार्थ्यांशी आपल्या पाल्याची तुलना न करता यश असो वा अपयश याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन पालकांनी दिला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या बुद्धीची कुवत, कष्ट करण्याची तयारी, विशिष्ट विषयात किंवा खेळात असलेला रस हे पालक आणि शिक्षकांच्या निरीक्षणातून ठरवावे. त्याप्रमाणे मुलांकडून तयारी करून घ्यावी, उपजत असलेल्या गुणांना खतपाणी घालून त्यात प्रावीण्य मिळविण्यात मदत करावी म्हणजे वेळ वाया जात नाही. विद्यार्थ्यांवर जबरदस्ती होत नाही. कोणालाही नैराश्य येणार नाही. पालकांनी पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत. त्याच्या पातळीवर जाऊन, त्याचे मित्र होऊन त्याची आवड, कल जाणून घ्यावा. दोघांत मित्रत्वाचे नाते असावे.
परीक्षा विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी आहे; इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नव्हे, ही जाणीव असावी. प्रयत्न करूनही पाल्याला अपयश आल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची तयारी आणि जेव्हा गरज असेल तेव्हा एक ‘जादू की झप्पी’ देण्यासाठी पुढाकार घेणेही आवश्यक आहे. शिवाय काही बाबी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. उदा. इतर मुलांशी तुलना, पाल्याला त्याच्या भूतकालीन अपयशाची आठवण करून देणे, पाल्याकडून अवाजवी व अवास्तव अपेक्षा बाळगणे पालकांनी टाळावे. ‘वेळेचे व्यवस्थापन’, ‘अभ्यासाचे नियोजन’ व ‘सकारात्मक दृष्टीकोन’ या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास परीक्षेच्या भीतीवर सहज मात करता येईल. सो फ्रेंड्स निकालासाठी तुम्हा सर्वांना ‘आॅल द बेस्ट’!

Web Title: Intimacy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.