रिपाइंमुळे युतीमध्ये धाकधूक
By admin | Published: April 7, 2015 05:13 AM2015-04-07T05:13:14+5:302015-04-07T05:13:14+5:30
राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घटक पक्षांना खिजगणतीत न पकडता, कोणत्याही चर्चेत सामील करून न
नवी मुंबई : राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत घटक पक्षांना खिजगणतीत न पकडता, कोणत्याही चर्चेत सामील करून न घेतल्याने संतापलेल्या रिपाइंच्या श्रेष्ठींनी १७ उमेदवारांची घोषणा करून शिवसेना - भाजपाला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच पूर्ण ताकदीनिशी उतरून शिवसेना - भाजपाला घाम फोडून ‘हम तो डुबेंगे, तुमको भी ले डुबेंगे’चा नारा दिला आहे.
यामुळे शहरातील रिपाइंचे वर्चस्व असलेल्या प्रभागांतील शिवसेना - भाजपा उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
शहरात दिघा, ऐरोली, रबाले, गोठीवली, तळवली, हनुमाननगर -महापे, घणसोली गावठाण, घणसोली सिम्प्लेक्स, तुर्भे स्टोअर, हनुमाननगर - तुर्भे, आंबेडकरनगर, रमाबाई आंबेडकरनगर बेलापूर, शिवाजीनगर नेरूळ या भागात रिपाइंची मोठी ताकद आहे. त्यामुळे रिपाइंने या भागात आपले उमेदवार उभे केले आहेत.
या भागात रिपाइंची मते निर्णायक असून महापालिका निवडणुकीतील मतदारांची संख्या आणि होणाऱ्या मतदानाची टक्केवारी पाहता ५०-१०० मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे रिपाइंचे उमेदवार युतीच्या उमेदवारांना घाम फोडण्याची चिन्हे आहेत. याचा लाभ काँगे्रस - राष्ट्रवादीला होणार आहे.
दरम्यान, रिपाइंने सोमवारी आपल्या १० उमेदवारांचे अर्ज भरले. पक्षाचा हा आक्रमक पवित्रा बघून युतीच्या स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले आहे. रिपाइंला या नेत्यांनी चर्चेला बोलाविले आहे. मात्र, सुधाकर सोनवणेंचे दोन प्रभाग वगळता आणखी १० ते १२ जागा आम्हाला शिवसेना - भाजपाने त्यांच्या कोट्यातील द्यायला हव्यात, असे पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष सिद्राम ओव्हळ यांनी ‘लोकमत’ला
सांगितले. (खास प्रतिनिधी)