इंटर्न्स डॉक्टरांचा संप मिटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 06:10 AM2018-06-18T06:10:17+5:302018-06-18T06:10:17+5:30
विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप अजूनही सुरूच आहे.
मुंबई : विद्यावेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न संघटनेच्या (अस्मी) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा संप अजूनही सुरूच आहे. रविवारी या संपाचा पाचवा दिवस होता. मात्र, या मागणीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकींच्या सत्रातून प्रश्न मार्गी लागत नसल्याने, हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि अर्थ विभाग दोघांनीही या प्रश्नी टोलवा-टोलवी सुरू केल्याने विद्यार्थ्यांनी संप बेमुदत काळासाठी सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, शनिवारी नागपूर येथे
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत इंटर्न डॉक्टरांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विद्यावेतनाचा प्रश्न पूर्णपणे वैद्यकीय शिक्षण विभागाचा आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीतून वैद्यकीय विभागाने इंटर्न डॉक्टरांची वेतनवाढ करणे अपेक्षित आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे आता पुन्हा
एकदा या विद्यावेतनवाढीचा मुद्दा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पदरी पडला आहे.
या संपाचा फटका मुंबईत बसला नसला, तरीही राज्याच्या अन्य भागांत यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ््यात सुरू असलेला हा संप आणखी किती लांबणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.