मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:56+5:302021-06-20T04:05:56+5:30
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचे बेकायदेशीररीत्या खासगीकरण करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असून, १० एकर जागा विकासकाला आंदण ...
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचे बेकायदेशीररीत्या खासगीकरण करण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असून, १० एकर जागा विकासकाला आंदण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत गोदी कामगारांनी शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.
सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. मुंबई बंदरातील कामगारांना चांगल्या रुग्णसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी झोडियाक हेलोक्ट्रॉनिक्स या कंपनीसमवेत करार करण्यात आला आहे. परंतु, करारातील अटींना हरताळ फासून मुंबई बंदराची दहा एकर जागा या कंपनीला हस्तांतरित करण्याचा घाट पोर्ट ट्रस्ट व्यवस्थापनाने घातल्याचा आरोप कामगारांचा आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन या मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. करारातील तरतुदींचे पालन केल्याशिवाय रुग्णालय हस्तांतरित करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र, न्यायालयाचे आदेश धुडकावत व्यवस्थापनामार्फत विश्वस्तांच्या बैठकीत हॉस्पिटलच्या हस्तांतराचा प्रस्ताव आणण्यात आला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कामगारांनी शुक्रवारी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली.
दरम्यान, दोन्ही कामगार विश्वस्तांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. सध्या हा प्रस्ताव केंद्रीय मंत्र्यांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हस्तांतरण झाल्याचे दाखवून स्वीकारली वैद्यकीय मदत
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे हस्तांतरण झाल्याचे दाखवून झोडियाक कंपनीने रोटरी फाऊंडेशनकडून वैद्यकीय मदत (डायलिसिसचे ११ युनिट) स्वीकारली. ही बाब लक्षात येताच कामगार संघटनांनी आक्षेप घेत रोटरी फाऊंडेशनला पत्र लिहिले आहे. झोडियाक कंपनीचे रुग्णालय अद्याप अस्तित्वात नसून, आपली फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ही डायलिसिस युनिट मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाकडे हस्तांतरित करावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.