खासगी ट्रॆंव्हल्सकडून गावी जाणाऱ्यांची लूट करण्याचा डाव, कमी आसन क्षमतेचा फटका प्रवाशांना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:25 PM2020-05-13T17:25:48+5:302020-05-13T17:26:13+5:30
विविध खासगी ट्रँव्हल्स कंपन्यांनी गावी जाण्यासाठी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
खलील गिरकर
मुंबई : कोरोनाचा प्रभाव मुंबई परिसरात झपाट्याने वाढत असताना मुंबईतून राज्याच्या विविध भागात खासगी वाहनाने जाण्यास परवानगी दिली जात आहे. मुंबईत अडकलेल्या व गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींना याचा मोठा लाभ होताना दिसत आहे. या सवलतीचा लाभ घेऊन विविध खासगी ट्रँव्हल्स कंपन्यांनी गावी जाण्यासाठी सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रवास करताना वाहनामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असल्याने एकूण आसन क्षमतेच्या निम्म्या आसनांवर प्रवासी बसवता येणार आहेत. त्यामुळे गावी जावू इच्छिणाऱ्यांची मोठी आर्थिक लूट होण्याची भीती आहे. अडचणीच्या काळात दरवाढ करुन अगतिक नागरिकांच्या हतबलतेचा लाभ उठवण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही खासगी बस सेवा पुरवणाऱ्यांनी सरकारी पास सहित सेवा उपलब्ध करुन मिळेल अशी जाहिरात सुरु केली आहे. या बसमधून एका वेळी केवळ 25 प्रवासी प्रवास करु शकतील. त्यांच्यासाठी मुंबईतून, विरारहून चिपळूण, लांजा, राजापूर जाण्यासाठी प्रति प्रवासी 1900 रुपये, खारेपाटण, तळेरे, कणकवली जाण्यासाठी 2100 रुपये व कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी जाण्यासाठी 2200 रुपये प्रति प्रवासी आकारले जाणार आहेत. 10 वर्षाच्या वरील मुलांना हा तिकीट दर अनिवार्य करण्यात आला आहे. 25 प्रवाशांची नोंदणी झाल्यांनतर सरकारी पास साठी अर्ज करण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे. ज्यांना गावी जायचे आहे त्यांनी अगोदर पैसे देऊन तिकीट आरक्षित करावे जेणेकरुन त्यानंतर पास तयार करुन प्रवास केला जाईल असे सांगण्यात येत आहे.
ज्या प्रवासासाठी एप्रिल मे महिन्यात कमाल एक हजार ते बाराशे रुपये लागतात त्या ठिकाणी खासगी बसचालक सुमारे दुप्पट रक्कम आकारणार आहेत त्यामुळे गावी जावू पाहणाऱ्या चाकरमान्यांची आर्थिक लूट होत असल्याचे चित्र आहे. बसच्या आसन क्षमतेच्या निम्म्या आसनांवर प्रवासी बसून जाणार असल्याने आम्हाला प्रवासाचा खर्च काढण्यासाठी ही दरवाढ करणे अत्यावश्यक असल्याचे बस चालकांचे म्हणणे आहे तर इतर वेळी जेव्हा बस चालक मोठा नफा कमावतात तेव्हा ते प्रवाशांना तिकीट दर कमी करुन दिलासा देत नाहीत. तर सध्याच्या बिकट अडचणीच्या काळात दुप्पट दरवाढ करणे हे चुकीचे व माणुसकीविरोधी असल्याचे मत सागर जाधव या प्रवाशाने व्यक्त केले.